बाळकृष्ण मसगे यांना उस्ताद बिस्मिल्ला खान, राष्ट्रीय युवा पुरस्कार जाहीर

ठाकर आदिवासी लोककलेचा भारत सरकारकडून राष्ट्रीय सन्मान

संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार-२०२४ महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत पिंगुळी येथील बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे.
कळसूत्री बाहुल्या व चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील ज्येष्ठ लोककलावंत कलागुरु गणपत सखाराम मसगे यांना २००५ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला होता. पिता-पुत्रांच्या या राष्ट्रीय कामगिरीमुळे ठाकर आदिवासी लोककलेचा गौरव पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
विशेष म्हणजे हा सन्मान कोणत्याही शिफारशी शिवाय केवळ कलाकाराच्या कलेतील योगदानाच्या आधारे दिला जातो. बाळकृष्ण मसगे यांनी लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांना आधुनिक सादरीकरणाची जोड देत नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळे या कलांविषयी नव्या पिढीमध्ये आकर्षण निर्माण झाले असून संशोधक आणि कला रसिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.
मुंबईतील सर जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून कला पदवी घेतल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत आर्ट डायरेक्टर म्हणून काम केले. मात्र लोककलेचा वारसा जपण्यासाठी त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. वडील तथा जेष्ठ लोककलावंत गणपत सखाराम मसगे यांच्या सहकार्याने त्यांनी ठाकरवाडी आदिवासी म्युझियमच्या उभारणीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते आज आदिवासी संस्कृती आणि लोककलेच्या अभ्यासाचे केंद्र बनले आहे.
ठाकर आदिवासी समाजाच्या पारंपरिक कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी आणि अन्य दुर्मिळ लोककलांचे जतन संवर्धन ते करीत आहेत. कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून त्यांनी वीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजा विक्रमादित्य, पंचवटी आणि लंका दहन यासारख्या ऐतिहासिक व पौराणिक कथांवर आधारित अनेक नाट्य प्रयोग देशभर सादर केले आहेत.
त्यांचे वडील गणपत मसगे यांना सन 2005 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता पुत्र बाळकृष्ण मसगे यांनीही राष्ट्रीय युवा सन्मान प्राप्त करून या गौरवशाली परंपरेत मानाचा अध्याय जोडला आहे. या पुरस्काराच्या घोषणेनंतर ठाकर समाज लोककला क्षेत्रातील मान्यवर सांस्कृतिक संस्था आणि कला रसिकांकडून बाळकृष्ण मसगे यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे. हा सन्मान केवळ एका कलाकाराचा नसून ठाकर आदिवासी समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा राष्ट्रीय गौरव मानला जात आहे.

error: Content is protected !!