एसआरएम कॉलेजमध्ये ‘स्पेस सायन्स अँड टेक प्रो-२०२६’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांनी केला अवकाश विज्ञानाचा अभ्यास
संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय ‘स्पेस सायन्स अँड टेक प्रो-२०२६’ ही अनुभवाधारित कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेत ४२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून अवकाश विज्ञान, रॉकेट तंत्रज्ञान आणि सी.टी.इ.एम.वर ( सायन्स , टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथेमॅटिक्स ) आधारित विविध उपक्रमांचा प्रात्यक्षिकांसहीत अनुभव घेतला.
या कार्यशाळेचे आयोजन नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स (एन.सी.एस. सी.)मुंबई, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, पुणे, इस्रो स्पेस टेक्नॉलॉजी सेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी आयोजक मान्यवरांनी कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थांना पटवून दिला. तसेच आपल्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात विज्ञान क्षेत्रांत आज जी प्रगती केली आहे त्याचा धावता आढावा व योगदानही कथन केले.
कार्यक्रमासाठी एन.सी.एस. सी.मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास नाईक-साटम, एन.सी.एस.सी.अधिकारी डॉ. चंद्रशेखर मराठे, इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, पुणेचे अध्यक्ष संतोष पिसे, सारस्वत बँक, कुडाळ शाखेच्या प्रमुख सौ. निलिमा प्रभू, सारस्वत बँक लिमिटेडच्या अधिकारी सौ. सुप्रिया सामंत तसेच संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दोन दिवसांच्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी वॉटर रॉकेट प्रक्षेपण, बलून कार निर्मिती, पॅराशूट मॉडेल तयार करणे, उपग्रह कक्षा आणि अवकाश विज्ञानाचा अभ्यास, वॉटर फिल्टर अभियांत्रिकी मॉडेल निर्मिती तसेच विविध हँड्स-ऑन एस.टी.इ.एम. पक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. प्रत्यक्ष प्रयोग, कृती आणि प्रकल्पांच्या माध्यमातून विज्ञान शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आणि कुतूहल दिसून आले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानातील मूलभूत संकल्पना, उपग्रहांचे कार्य, रॉकेट तंत्रज्ञान तसेच विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण आणि वैज्ञानिक चर्चासत्रे हे कार्यशाळेचे विशेष आकर्षण ठरले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. भावेश चव्हाण, प्रा. प्रज्ञा सावंत तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात जाण्यासाठी प्रेरित केले.





