मौजे तिरोडा, ता. सावंतवाडी येथील तीन वयोवृद्ध निराधार भावंडांना जीवन आनंद संस्थेचा आधार

सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा येथील अत्यंत हलाखीच्या व निराधार परिस्थितीत जीवन जगणाऱ्या तीन वयोवृद्ध भावंडांना जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमने आश्रय देत त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

दशरथ अर्जुन काळूजी (वय 65), श्रीमती रत्नप्रभा अर्जुन काळूजी (वय ६०) आणि श्री. विजय अर्जुन काळूजी (वय ५५) ही भावंडे अनेक वर्षांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत होती. वडील लहानपणीच वारल्यामुळे लहानपणापासूनच आईसह त्यांचे संगोपन मामाकडे झाले. स्वतःचे घर नाही. आयुष्यभर त्यांनी मजुरी करून उदरनिर्वाह केला. दशरथ काळूजी यांनी गोव्यात काही वर्षे रंगकाम केले होते, तर छोटा भाऊ विजय काळूजी यांनी मुंबई मध्ये एक वर्ष काम केले व त्याच्यानंतर तो गावी परत आला.

वाढते वय, आर्थिक दुर्बलता आणि आधाराचा अभाव यामुळे या तिघांनाही राहण्याची व उदरनिर्वाहाची गंभीर समस्या निर्माण झाली होती. ते एका झोपडीत राहत होते. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची कोणतीही शाश्वत व्यवस्था त्यांच्याकडे नव्हती.

त्यांची दयनीय अवस्था लक्षात आल्यानंतर स्थानिक कार्यकर्ते श्री. संदेश सावंत यांनी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष श्री. संदिप परब यांच्याशी संपर्क साधून तातडीच्या मदतीची विनंती केली.

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन संस्थेने तत्काळ कार्यवाही करत दिनांक 22 मे 2026 रोजी या तिन्ही ज्येष्ठ नागरिकांना पणदूर (ता. कुडाळ) येथील संविता आश्रमात दाखल करून घेतले.

सध्या त्यांना संस्थेमार्फत सुरक्षित निवारा, भोजन, वस्त्र, वैद्यकीय सेवा तसेच सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

निराधार, बेघर व असहाय व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी जीवन आनंद संस्था सातत्याने कार्यरत असून, काळूजी कुटुंबाला दिलेला हा आधार समाजातील वंचित घटकांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

error: Content is protected !!