कोमसाप मालवणच्या संगीत स्वराशा मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोमसाप शाखा मालवणच्या महिला विभागाने स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेला संगीत स्वराशा हा संगीत सोहळा नुकताच डॅफोडिल्स रिसॉर्ट आचरा येथे संपन्न झाला. या सोहळ्याचा शुभारंभ पुणे येथील ज्येष्ठ बासरी वादक विजयराव देसाई यांनी आशाताईंची आवडती चैती लोकधून वाजवून केला.
आदरणीय सुरेश ठाकूर, अध्यक्ष कोमसाप शाखा मालवण, यांच्या संकल्पनेने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दहा गायिकांनी आपल्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
रश्मी आंगणे – जय शारदे
वागेश्वरी, स्मिता हडकर – नाच रे मोरा, अर्चना जोशी – एका तळ्यात होती, ऋतावरी वळंजू- राधा गौळण करिते मंथन, वंदना राणे- ये रे घना, वर्षाराणी अभ्यंकर- आज कुणितरी यावे, आदिती मसुरकर – रुपेरी वाळूत, देवयानी आजगावकर – विकत घेतला श्याम, श्रावणी प्रभू – भरजरी गं पितांबर, स्वराशा कासले – मागे उभा मंगेश या गायिकांनी आपल्या मधुर आवाजाने वातावरण मंत्रमुग्ध केले.
अनघा कदम यांच्या अप्रतिम आणि उत्तरोत्तर बहरत जाणाऱ्या सूत्रसंचालनाने आशाताईंचे रसिक भारावून गेले.
आदरणीय मंदार सांबारी यांनी भरजरी पितांबर नेसूनी, रुपेरी वाळूत माडांच्या बनात, आज कुणीतरी यावे.तळ्यातील बदके, नाचऱ्या मोरासवे शारदेसह मंगेशाने मागे उभे राहावे, घनवर्षावासह राधेशामाने इथे यावे अन् क्षण आमुचे फुलवावे अशी आगळीवेगळी काव्यरूपात प्रतिक्रिया देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले. कोमसाप मालवणचे अध्यक्ष, आदरणीय सुरेश ठाकूर यांनी स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल समस्त रसिकांतर्फे कृतज्ञता व्यक्त केली. आशाताईंच्या बहुआयामी गायकीने अनेक पिढ्यांना संगीताची प्रेरणा मिळाली. त्यांचा स्वरवारसा रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवीत राहील असे उद्गार काढले.कोणत्याही संगीत साथीशिवाय आशाताईंची गाणी आपल्या सुरेल आवाजाने गावून अनोखी स्वरवंदना दिल्याबद्दल गायिकांचे कौतुक केले. कोमसापचे ज्येष्ठ सदस्य गिरिधर पुजारे, डोंबिवली यांच्या हस्ते सर्व गायिकांना आणि सूत्रसंचालकांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला कोमसाप कार्यकारिणी सोबतच मा. रुजारिओ पिंटो, जिल्हा संघटक कोमसाप, मा. रामचंद्र आंगणे, माजी उपशिक्षणाधिकारी जि. प.सिंधुदुर्ग, मा.दत्तात्रय मुळीक, माजी गटशिक्षणाधिकारी मालवण,
मा.जेरॉन फर्नांडिस, सरपंच, आचरा,मा.सुनंदा कांबळे, विजयदुर्ग, मा. अशोक कांबळी, अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, मा.बाबाजी भिसळे,अध्यक्ष, रामेश्वर वाचन मंदिर आचरा, मा.निलेश सरजोशी , आचरा, सदानंद कांबळी, सुरेश गावकर, विजय चौकेकर, पांडुरंग कोचरेकर, गुरुनाथ ताम्हणकर, सुरेंद्र सकपाळ, रामचंद्र कुबल, श्रुती गोगटे, मनाली फाटक, रमाकांत शेटये ,महादेव बागडे, प्रकाश पेडणेकर, चंद्रशेखर धानजी, विनोद कदम, सायली परब, नेहा बापट, उज्वला धानजी, मधुरा माणगावकर आदी कोमसापचे सदस्य व इतर रसिकवर्ग उपस्थित होते.

error: Content is protected !!