काथ्या उद्योगाचे धडे घेणार ‘एसआरएम’चे ४० विद्यार्थी

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम
दोन महिन्यांच्या काथ्या प्रशिक्षणाला प्रारंभ
येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांच्या काथ्या उद्योग प्रशिक्षणाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी (IQAC) आणि प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कौशल्य विकास प्रशिक्षणात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमाला कॉयर बोर्ड ऑफ इंडिया (प्रादेशिक कार्यालय, कणकवली)चे प्रादेशिक अधिकारी बी. श्रीनिवास आणि राधिका पावसकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीनिवास यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉयर बोर्डचे प्रादेशिक कार्यालय सुरू झाल्याचे सांगितले. या कार्यालयामार्फत दोन महिने, सहा महिने आणि एक वर्ष कालावधीचे विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविले जात असून, जिल्ह्यात काथ्या उद्योगाला चालना देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
काथ्या उद्योगाचे अर्थकारण आणि त्यातील रोजगार व उद्योजकतेच्या संधी स्पष्ट करताना हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. महाविद्यालयात अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
प्रमुख प्रशिक्षक राजाराम राऊळ आणि रुची राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना काथ्यापासून दोरी तयार करणे, दोरीपासून पायपुसण्या तसेच विविध आकर्षक शोभेच्या वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कॉयर बोर्ड ऑफ इंडियाकडून अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राजाराम राऊळ यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, स्वावलंबन आणि उद्योजकता विकसित करण्यासाठी महाविद्यालय सातत्याने विविध कौशल्य विकास उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेत स्वतःचा उद्योग उभारावा आणि या प्रशिक्षणाचे खऱ्या अर्थाने सार्थक करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व आभार प्रदर्शन डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले. यावेळी डॉ. एस. एल. लोखंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.






