बी.एल.ओ.ड्युटीतून मुक्ततेसह अन्य मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचा उद्या शाळा बंद व भव्य मोर्चा 22जुलैला राज्यभर आंदोलन

महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला असून मतदार यादीच्या विशेष संघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेअंतर्गत शिक्षकांना बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांमधून पूर्णपणे मुक्त करावे, या प्रमुख मागणीसह 22 जुलै रोजी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठ माध्यमातून 22 जुलैला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय
घेण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जाहीर केले आहे की, 22 जुलै रोजी जिल्ह्यातील अनेक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे सकाळी ११ वाजता प्राथमिक शिक्षक पतपेढी प्रधान कार्यालय पासून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनातील शिक्षकांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
शिक्षकांना BLO सारख्या शैक्षणिकेतर कामांतून पूर्णपणे मुक्त करावे.२०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET परीक्षेतून सूट द्यावी.शिक्षकांच्या पदोन्नती धोरणात अनुभव आणि ज्येष्ठतेला प्राधान्य द्यावे.TET परीक्षा अधिक व्यावहारिक आणि शिक्षकाभिमुख करावी.शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, निवडणूक, जनगणना, मतदार यादी पुनरावलोकन यांसारख्या प्रशासकीय कामांमुळे शिक्षकांचा मोठा वेळ जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक वेळ मिळत नाही. शिक्षकांचे मुख्य काम अध्यापन असून, त्यांना अतिरिक्त शासकीय कामांमधून मुक्त करणे गरजेचे असल्याचे संघटनांनी म्हटले आहे.संघटनांनी २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET परीक्षेतून सूट देण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकांना पुन्हा पात्रता परीक्षा देण्याची सक्ती योग्य नसल्याचे त्यांचे मत आहे. तसेच सध्याची TET रचना अधिक व्यवहार्य करण्याची मागणीही करण्यात आली आहे.पदोन्नती धोरणावर नाराजी राज्य सरकारच्या नव्या पदोन्नती धोरणावरही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्याच्या व्यवस्थेत अनुभव आणि ज्येष्ठतेचा पुरेसा विचार होत नसल्यामुळे दीर्घकाळ सेवा करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
शिक्षक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून BLO काम, TET नियम आणि पदोन्नती धोरणाबाबत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सरकारने लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी दिला आहे.






