सावंतवाडीत २६ ला जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिर

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी अध्यक्ष कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्ताने आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा पंच परीक्षा उत्तीर्ण कबड्डी पंच,राज्य कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण पंच तसेच ९ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य कबड्डी पंच परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत कबड्डी पंचांकरिता, तसेच जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक,कार्यरत कबड्डी पंचांकरिता या कबड्डी पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांनी प्रसिद्धीस दिलेली आहे .
याप्रसंगी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेमध्ये फ्रेशर आणि रिफ्रेशर या दोन्ही विभागात विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय पंचांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. या शिबिर संघटनेच्या पंच मंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यरत ज्येष्ठ पंचांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. यामध्ये अखिल भारतीय कबड्डी संघटनेने तयार केलेले कबड्डी खेळाचे सामान्य नियम, सुधारित नियम, याचे अवलोकन करून दिले जाणार असून, व्हिसलिंग, सिग्नलिंग,मुख्य गुणपत्रक, सहाय्यक गुणपत्रक,तिसरी चढाई, अशी गुणपत्रके भरणे, मैदानावर पंच म्हणून आपले वर्तन व अचूक न्यायदानाची भूमिका, पंचांची मानसिकता, मैदानावरील त्यांची हालचाल, देहबोली व सामन्यावरील त्यांची पकड, त्यांची दक्षता, पंच – सरपंच म्हणून त्यांची कर्तव्ये, अशा सर्वांगीण बाबींवर या शिबिरामध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे।
जिल्हा व राज्य पंच परीक्षा देताना कोणती काळजी घ्यावी, त्याचा सराव कसा करावा, प्रात्यक्षिकावर कसा भर द्यावा, पंचांनी निर्णय क्षमता कशी सुधारावी व त्याबाबतचे व प्रत्यक्ष सामन्यांमध्ये येणाऱ्या समस्या व त्यावर अचूक निर्णय कसे द्यावे याबाबतही तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळच्या सत्रात प्रत्यक्ष मुलांचा सामना आयोजित करून पंचांकडून प्रात्यक्षिके करून घेतली जाणार आहेत, अशी माहिती पंच मंडळाच्या वतीने पंचमंडळ अध्यक्ष प्रशांत वारीक यांनी कळविलेले आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो व पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, प्रदेश चिटणीस सुरेश गवस व कै .अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या पंच शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त कार्यरत पंचांनी, क्रीडा शिक्षक व कबड्डी कार्यकर्त्यांनी लाभ घ्यावा व आपले नाव नोंदणी दिनांक २४ जुलें पर्यंत करावी असे आवाहन कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांनी केले आहे.
शिबिराच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी करिता संपर्क कार्यवाह दिनेश चव्हाण यांच्याशी करावा ९४२२४३४२६५ असे आवाहन करण्यात आले आहे.





