युवानेते प्रताप भोसलेंच्या वाढदिनी भरगच्च कार्यक्रम

वैद्यकीय, शालेय साहित्य वाटपासह विविध स्पर्धांचेही आयोजन
जिल्हाभरात कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू
मराठा समाजाचे युवा नेते, प्रतिथयश उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांचा वाढदिवस प्रतिवर्षाप्रमाणे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. वाढदिवसानिमित्त बुधवार, २२ जूलैला शालेय साहित्य वाटप, रुग्णालयांमध्ये औषध, गोळ्या वाटप, स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोट, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपासह विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रताप भोसले यांचा वाढदिवस दरवर्षीच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. त्या व्यतिरिक्त देखील भोसले यांचे सामाजिक उपक्रम वर्षभर सुरू असतात. त्यांच्याच मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली दरवर्षी कणकवलीत शिवजयंती उत्सव समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य दुचाकी – चारचाकी रॅली देखील काढली जाते. याच दिवशी सिंधुदुर्गातील अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना आवश्यक ती मदतही केली जाते.
श्री. भोसले यांचा वाढदिवस बुधवार, २२ जुलैला साजरा होत आहे. त्यानिमित्त विशेषतः कणकवली तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी साहित्य वाटप करण्यात येणार आहे. अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये असणारी गोळ्या ,औषधांची कमतरता लक्षात घेऊन वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. कलमठ परिसरात स्वच्छता कामगार मोठ्या संख्येने असून त्यांना पावसाळ्यात उद्भवणारी समस्या लक्षात घेऊन रेनकोट व हँगग्लोव्हज वाटपही करण्यात येणार आहे. फोंडाघाट परिसरात वाचन, अंताक्षरी, हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रीडाविषयक साहीत्य वाटपही करण्यात येणार आहे.
प्रताप भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाभरातील कार्यकर्ते करत आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे, आवाहन प्रताप भोसले यांचे मित्रमंडळ तसेच शिवजयंती उत्सव समिती कणकवली यांच्यातर्फे करण्यात आले आहे.





