ओरोसमध्ये बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालयाचे उद्घाटन

जनतेला जलद सेवा, जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध : शिब प्रसाद बिस्वाल

बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालयाच्या माध्यमातून जनतेला अधिक जलद आणि परिणामकारक सेवा देत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम केले जाईल, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाच्या प्रधान कार्यालय, मुंबईचे महाप्रबंधक शिब प्रसाद बिस्वाल यांनी केले.
यापूर्वी कुडाळ येथे कार्यरत असलेले बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालय शनिवारी ओरोस येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाशेजारील स्वतःच्या इमारतीत स्थलांतरित झाले. नव्या कार्यालयाचे उद्घाटन महाप्रबंधक शिब प्रसाद बिस्वाल यांच्या हस्ते आंचलिक प्रबंधक नरेंद्र देवरे, उपआंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आजाद आणि जिल्हा अग्रणी प्रबंधक ऋषिकेश गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना शिब प्रसाद बिस्वाल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँक ऑफ इंडियाचे कार्य उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक म्हणून कार्यरत असून, ओरोस येथे स्वतःच्या जागेत कार्यालय सुरू होणे ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा मुख्यालयात कार्यालय आल्यामुळे नागरिकांची कामे अधिक वेगाने होतील. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठीही प्रभावी प्रयत्न केले जातील.
आंचलिक प्रबंधक नरेंद्र देवरे यांनी नव्या कार्यालयामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. उपआंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आजाद यांनी कार्यालय उभारणीत सर्वांच्या सहकार्याची दखल घेतली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा अग्रणी प्रबंधक ऋषिकेश गावडे यांनी केले.

error: Content is protected !!