लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करायचेच नाही का – राजन नाईक

शिवसेना शिंदे गट महागाईचे समर्थन करतोय का?

माजी आमदार वैभव नाईक यांनी २७ मे रोजी महागाई विरोधात केलेल्या आंदोलनावरून आता कुडाळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या आंदोलनाविरोधात शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा आरोप ठाकरे सेना तालुका प्रमुख राजन नाईक यांनी केला आहे. श्री. नाईक यांनी शिंदे गट आणि पोलीस प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शिवसेना तालुका प्रमुखांनी महागाईचे समर्थन करण्यासाठीच हे पत्र दिले का? लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करायचेच नाही का, असा संतप्त सवाल राजन नाईक यांनी उपस्थित केला. कुडाळ येथील शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना राजन नाईक म्हणाले की, २७ मे रोजी माजी आमदार वैभव नाईक यांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या महागाईच्या मुद्द्यावर तीव्र आंदोलन छेडले होते. मात्र, या आंदोलनाविरोधात कुडाळ शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख यांनी पोलिसांना पत्र दिले आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. राणे यांनी दिलेले हे पत्र म्हणजे एकप्रकारे महागाईचे समर्थन करण्यासारखेच आहे.
राजन नाईक यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत सवाल केला की, आज सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. अशा वेळी विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रश्नांसाठी आंदोलन करायचे नाही का? जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न चालला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही बोट ठेवले. एखाद्या राजकीय पदाधिकाऱ्याने पत्र दिले म्हणून तात्काळ गुन्हा दाखल केला जातो, हा एक अत्यंत चुकीचा आणि नवीन पायंडा पाडला जात आहे. शिवसेना तालुका प्रमुख हे पोलिसांचे सल्लागार झाले आहेत की काय?”असा टोलाही त्यांनी लगावला.
सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली येऊन विरोधकांचे आवाज दाबण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करत, जनतेच्या प्रश्नांसाठी आपले आंदोलन आणि संघर्ष असाच सुरू राहील, असा इशाराही उबाठा गटाकडून यावेळी देण्यात आला.

error: Content is protected !!