आपला आवाज हि आपली ओळख – श्रीनिवास नार्वेकर

एसआरएम कॉलेज यामध्ये आवाज संस्करण कार्यशाळा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गसह गोव्यातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद

आपला आवाज हि आपली ओळख आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा चांगलं बोललं कि आपली चांगली छाप पडते. त्यासाठी आवाज आणि तो कसा वापरावा हे शिकणं महत्वाचं आहे. त्यासाठीच संत राऊळ महाराज महाविद्यलयाने विद्यार्थ्यांपासून सर्वांसाठी या आवाज संस्करण कार्यशाळेच आयोजन केलं आहे. यासाठी महाविद्यालयाचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे, अस प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी आणि स्वर संस्कार तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांनी केलं. येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात महाविद्यलयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आवाज व कथाकथन संस्करण कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला सिंधुदुर्गसह गोव्यातूनही विविध वयोगटातील सुमारे ७५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
आपला आवाज हि आपली ओळख आहे. चांगलं,स्पष्ट बोलण्याने आपली छाप पडते. त्याच बरोबर कथाकथन सुद्धा एक कला आहे. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी शुक्रवारी १७ जुलै रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालयात आवाज व कथाकथन संस्करण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उदघाटन कुडाळ येथील बाबा वर्दम थियेटर्सच्या अध्यक्षा सौ. वर्षा वैद्य यांच्या सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि देवी सरस्वतीच पूजन करून झालं. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बाबा वर्दम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत, उदघाटक सौ. वर्षा वैद्य, मार्गदर्शक श्रीनिवास नार्वेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, रंगकर्मी निलेश जोशी, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मंगेश जांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष केदार सामंत यांनी आवाजाचे महत्व, महाविद्यालयात शिकताना सांस्कृतिक क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रातही चांगला आणि स्वच्छ आवाज कसा महत्वाचा आहे हे सांगितलं. तर उदघाटक वर्षा वैद्य यांनी सुद्धा आवाजाचं महत्व विविध उदाहरणातून पटवून दिल. यावेळी रंगकर्मी निलेश जोशी, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवीन्द्र ठाकूर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. संतोष वालावलकर यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. सुहास पाटील यांनी करून दिला. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य. डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले.
या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाबरोबरच इतर क्षेत्रातील व्यक्ती सुद्धा सहभागी झाल्या होत्या. गोव्यातून सुद्धा काही प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. सुमारे ७५ प्रशिक्षणार्थीनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
मार्गदर्शक श्रीनिवास नार्वेकर यांनी आवाजाच्या बाबत अगदी छान मार्गदर्शन केले. आवाजाची जाणीव आणि योग्य वापर, प्रभावी, आत्मविश्वासपूर्वक आणि स्पष्ट कसे बोलायचे, व्हॉइस प्रोजेक्शन आणि मोड्युलेशन, योग्य शब्दोच्चार, लय, चढ-उतार आणि शब्दांचे वजन, श्रोत्यांचे लक्ष कसे वेधायचे, कथाकथना बाबतच्या टिप्स, अभिनय, डबिंग, व्हॉईसओव्हर व कथाकथनातील प्राथमिक गोष्टी, स्टेजवरील भीती कशी घालवायची अशा गोष्टी श्रीनिवास नार्वेकर यांनी अत्यंत सोप्या शैलीत प्रशिक्षणार्थीना सांगितल्याच पण त्यांच्या विविध शंकांचे निरसन देखील केले. कार्यशाळेत सहभागी झालेल्याना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने मेहनत घेतली.

error: Content is protected !!