सोनाम वांगचुक आणि दीपक बिचके यांच्या ‘पेपर फुटी’ विरोधी आंदोलनाला युवा सेनेचा जाहीर पाठिंबा

कुडाळ हायस्कूलसमोर उद्या स्वाक्षरी मोहीम
देशातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान करणाऱ्या ‘पेपर फुटी’च्या गंभीर प्रकरणांविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनाम वांगचुक आणि दीपक बिचके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी उद्या, सोमवारी २० जुलै सकाळी ठीक ११:३० वाजता कुडाळ हायस्कूलसमोर ‘एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या विशेष स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेतर्फे या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, यात विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या देशपातळीवर विविध स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक परीक्षांचे पेपर फुटत असल्याने प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा झाला आहे. या अन्यायाविरोधात सोनाम वांगचुक आणि दीपक बिचके यांनी आक्रमक पाऊल उचलत आंदोलन सुरू केले आहे. देशाच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ही कीड थांबवण्यासाठी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी कुडाळमधील युवा सेनेने या लढ्यात उडी घेतली आहे.
या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून केंद्र सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जाणार आहे. तरी कुडाळ परिसरातील सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, तरुण आणि नागरिकांनी उद्या सोमवार, सकाळी ११:३० वाजता कुडाळ हायस्कूलसमोर उपस्थित राहून ‘एक सही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या मोहिमेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांनी केले आहे.






