‘नीट’मध्ये बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या आदर्श काणेकरची झेप

575 गुणांसह ऑल इंडिया रँकमध्ये उल्लेखनीय यश
नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) मध्ये कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल (सीबीएसई) चा विद्यार्थी आदर्श नितीन काणेकर याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आदर्शने 720 पैकी 575 गुण मिळवत 98.95 पर्सेंटाइल प्राप्त केली असून, ऑल इंडिया रँकमध्ये 20 हजारांच्या आत स्थान मिळवले आहे. तसेच त्याने कॅटेगरी रँक 9831 मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे.
बॅरिस्टर नाथ पै करिअर अकॅडमीत मार्गदर्शन घेतलेल्या आदर्शने विषयनिहायही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बायोलॉजीमध्ये 96.60 टक्के, केमिस्ट्रीमध्ये 99.70 टक्के आणि फिजिक्समध्ये 97.56 टक्के गुण मिळवत त्याने विशेष नैपुण्य सिद्ध केले.
या यशामागे बायोलॉजीचे शिक्षक विजयसिंह, मधुरा इन्सुलकर, मंदार जोशी, निशांत झा तसेच इतर विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे आदर्शने सांगितले. गेल्या तीन वर्षांतील सातत्यपूर्ण मेहनत, नियमित अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनामुळे माणगाव येथील रहिवासी असलेल्या आदर्शने हे यश संपादन केले.
या यशाबद्दल बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर तसेच शाळेच्या प्राचार्या चैताली बांदेकर यांनी आदर्श, त्याचे मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले.
इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शंभर टक्के उपस्थिती राखत आदर्शने विषय शिक्षकांकडून घेतल्या जाणाऱ्या अतिरिक्त मार्गदर्शन वर्गांनाही नियमित उपस्थिती लावली. त्याची मेहनत, चिकाटी, अभ्यासूपणा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहेत.
एमबीबीएस करून डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या आदर्शच्या या यशामुळे त्याच्या ध्येयाला नवी दिशा मिळाली आहे.
आदर्शचे आई-वडील नीता आणि नितीन काणेकर यांनी या यशाचे श्रेय बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, शाळेतील सर्व शिक्षक, विशेषतः बायोलॉजीचे शिक्षक विजयसिंह आणि इतर मार्गदर्शक शिक्षक यांना देत संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
नीट परीक्षेतील या उल्लेखनीय यशाबद्दल आदर्श नितीन काणेकरचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.






