सिंधुदुर्ग जिल्ह्यात हरित ऊर्जेकडे मोठे पाऊल

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून सौरऊर्जा उपक्रमाला गती
सिंधुदुर्गमध्ये शाळा, आरोग्य केंद्रांवर बसणार सोलर पॅनेल
पर्यावरणपूरक व ऊर्जाबचतीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा राज्यातील एक अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी काल मंत्रालयातील माझ्या दालनात महाप्रीत (महत्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड) आणि जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
या करारानुसार जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा योजना इमारती तसेच इतर सर्व शासकीय इमारतींवर सौर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे हरित ऊर्जेचा वापर वाढण्यासोबतच वीज खर्चातही मोठी बचत होणार आहे.
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार मा. श्री. नारायण राणे साहेब यांच्या आग्रहातून तसेच मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रत्यक्षात येत आहे. दरम्यान, या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर तसेच महाप्रीतचे मुख्य अभियंता श्री. वहाणे उपस्थित होते.





