‘चला कुडाळ घडवूया’ च्या माध्यमातून मंदार शिरसाट यांनी जपली सामाजिक बांधिलकी – आम. महेश सावंत

कुडाळ येथील ‘आकाशदर्शन’ कार्यक्रमाला खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थी आणि पालकांनी अनुभवले आकाशदर्शन

राजकीय माणसासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची असते. ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमातून मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी जे उपक्रम राबविले आहेत ते कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन माहीमचे आमदार महेश सावंत यांनी केले. नगरसेवक मंदार शिरसाट यांनी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या पटांगणात शनिवारी सायंकाळी उशिरा ‘आकाश दर्शन व खगोलशास्त्र करियर संधी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आमदार महेश सावंत बोलत होते. खगोल तज्ज्ञ तथा विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे आणि त्यांच्या टीमने यावेळी विद्यार्थी आणि पालकांना आकाशदर्शन घडविले. या कार्यक्रमाला खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मंदार शिरसाट यांनी चला कुडाळ घडवूया या उपक्रमांतर्गत यापूर्वी दोन कार्यक्रम घेतले. यामध्ये मान्यवर तज्ञानी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले. त्याला विद्यार्थी, पालक यांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावेळी मांडणार शिरसाट यांनी येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या पटांगणावर ‘आकाश दर्शन व खगोलशास्त्र करियर संधी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुरुवातीला कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि माहीमचे आमदार महेश सावंत यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ करण्यात आला. त्यांनतर आमदार महेश सावंत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सारस्वत बँकेचे संचालक सुनील सौदागर, कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, अनिल कुलकर्णी, ठाकरे सेने तालुका प्रमुख राजन नाईक, बबन बोभाटे, अमरसेन सावंत, अवधूत मालंडकर, संतोष शिरसाट, मनोज वालावलकर, ऍड. अमोल सामंत, आयोजक मंदार शिरसाट, श्री. म्हाडेश्वर, सुशील चिंदरकर तसेच बॅ. नाथ पै विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, संस्था प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार महेश सावंत यांनी मंदार शिरसाट यांचे कौतुक केले. आज विज्ञान पुढे गेला आहे. त्यात देखील करियरची संधी आहे. मुलांमध्ये त्याची आवड निर्माण करण्याचे काम मंदार शिरसाट यांनी आपल्या या उपक्रमातून केले आहे. राजकारणी माणसाला सामाजिक बांधिलकी महत्वाची आहे. ते काम मंदार शिरसाट करत आहेत त्यासाठ त्यांचे कौतुक आहे, असे आमदार सावंत यांनी सांगितले.
माजी आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा मंदार शिरसाट यांचे अभिनंदन केले. खगोल शास्त्राची माहिती आणि त्याविषयीची आवड विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून होईल स विश्वास श्री. नाईक यांनी व्यक्त केला. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी देखील या उपक्रमाबद्दल मंदार शिरसाट यांचे अभिनंदन केले. आकाशाविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते ती उत्सुकता जागविण्याचे काम आणि या क्षेत्रातील करियरच्या संधी याविषयीची माहिती या उपक्रमातून मिळत असल्याचे श्री. पारकर यांनी सांगितले.
उदघाटन सोहळ्यानंतर खगोल तज्ज्ञ तथा विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सध्या भारतातील मुलांना अंतराळवीर बनण्याची चांगली संधी असून आवड असेल तर त्यांनी या क्षेत्रात यायचा विचार करावा असे श्री. प्रभुणे यांनी सांगितले. त्यानंतर तीन दुर्बिणीच्या साहाय्याने विद्यार्थी आणि पालक यांनी आकाशदर्शन केले. चंद्र आणि आकाशातील इतर ग्रह, तारे दाखविण्यात आले. तसेच लेझर शोच्या माध्यमातून राशी नक्षत्र व आकाशातील विविध गोष्टी दाखवण्यात आल्या. यावेळी सुमारे ३०० हुन जास्त विद्यार्थांनी याचा लाभ घेतला. कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेला चांदोबाचा सेल्फी पॉईंट बच्चे कंपनीचा आकर्षण बिंदू ठरला होता.
यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश गुरव यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि खगोलप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!