कुडाळ पं.स. ची २७ ला आमसभा

तब्बल ७ वर्षांनी होतेय आमसभा
२६ एप्रिल पर्यंत निवेदने देण्याचे आवाहन
कुडाळ पंचायत समितीची आमसभा तब्बल सात वर्षानंतर प्रथमच २७ एप्रिलला सकाळी ११ वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कुडाळ पंचायत समितीच्या 2025 -26या वित्तीय वर्षात केलेल्या कामकाजाचा आढावा या आमसभेत घेण्यात येणार आहे. ज्यांना या आमसभेत निवेदने द्यायची आहेत त्यांची ही निवेदने २६ एप्रिल दुपारपर्यंत द्यावीत स्वीकारली जातील, अशी माहिती पत्रकार परिषदेत सभापती मिलिंद नाईक यांनी दिली
कुडाळ पंचायत समिती आमसभा पार्श्वभूमीवर आज सभापती मिलिंद नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, काका कुडाळकर, उमेदचे गणेश राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती नाईक म्हणाले, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ते आमदार झाल्यानंतर प्रथमच आमसभा होत आहे. या अगोदरची आमसभा ही मार्च २०१९ मध्ये झाली होती त्यानंतर तब्बल सात वर्षानंतर ही आमसभा होत आहे. दरम्यानच्या चार वर्षाच्या कालावधीत प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती. २७ रोजी होणाऱ्या आमसभेला ज्यांना गावातील विकास कामावर किंवा इतर निवेदने द्यायची असेल त्यांची २६ एप्रिल दुपारपर्यंत ही निवेदने पंचायत समितीत स्वीकारली जातील असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.





