कुडाळ येथे १२ एप्रिल रोजी विशाल हिंदू संमेलन

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान

कुडाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कुडाळ येथे “विशाल हिंदू संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे पार पडणार आहे.
हजारो वर्षांची परंपरा, संतांचे विचार, क्रांतिकारकांचे बलिदान आणि आपल्या पूर्वजांनी जपलेली सनातन हिंदू संस्कृती याबद्दल अभिमान जागवणे तसेच समाजात एकता, संस्कार आणि राष्ट्रभक्ती दृढ करणे या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनात डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे प्रेरणादायी बौद्धिक सत्र होणार असून, त्यासोबतच वक्तृत्व स्पर्धा, वेषभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर तसेच आकर्षक सेल्फी पॉईंट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच समाजनिर्मितीसाठी महत्त्वाचा असलेल्या पंचपरिवर्तन या संकल्पनेवर विशेष भर देण्यात येणार असून त्यामध्ये पर्यावरण संरक्षण, स्वच्छताबोध, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि नागरिक कर्तव्य या मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी सम्राट (तुळसीदास) कुडतरकर हे संयोजक, वामन (दादू) म्हापणकर हे कोषाध्यक्ष तर राहुल (पप्पू) पाटणकर हे सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत. तसेच समिती सदस्य म्हणून गोपाळ (महेश) राऊळ, डॉ. जय राऊळ, उदय कुडाळकर, अॅड अमोल मालवणकर, श्रीराम श्रीकृष्ण शिरसाट, शेखर (बंड्या) केळबाईकर, संजय पिंगुळकर, ओंकार ओटवणेकर, महेंद्र बांदेकर आणि विवेक पंडित आदी कार्यरत आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन सम्राट कुडतरकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!