सामंत साहेब त्यावेळी फक्त “स्वा” बंद होता,आता नगरपंचायत सत्ताधारी “स्वाःहा” च्या भूमिकेत

मंत्री उदय सामंत सत्ताधाऱ्यांच्या स्वाःहा च्या भूमिकेवर लक्ष देणार का?
प्रचारावेळी या मुद्द्यावरून भाजपावर केली होती टीका
गडनदीपुलावरील नगरपंचायत च्या स्वागत फलकाबाबत केलेल्या वक्तव्याची आर्या राणे यांनी करून दिली आठवण
कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीत प्रचारादरम्यान भाजपाच्या सत्तेच्या कारभारावर आरोप करताना मंत्री उदय सामंत यांनी कणकवली नगरपंचायत मार्फत गड नदी पूलावर लावलेल्या इलेक्ट्रॉनिक्स स्वागत फलकाबाबत एक वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम पसरवला होता. पण गेले 28 दिवस तो फलक बंद आहे. व त्यातील स्वा आणि गत हे दोन्ही शब्द बंद होऊन नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी सध्या स्वाःहा ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे याबाबत उदय सामंत साहेब आता शहर विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांना सूचना देतील काय? असा सवाल भाजपाच्या प्रभाग 10 च्या नगरसेविका आर्या राणे यांनी उपस्थित केला आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉर्नर सभेवेळी मंत्री उदय सामंत म्हणाले होते की नगरपंचायत लावलेल्या फलकामध्ये कणकवली नगरपंचायत आपले स्वागत करत आहे या वाक्यातील स्वा हा शब्द बंद झाला असल्यामुळे गत हा शब्द फक्त दिसत आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांनी नगरपंचायती काय गत केली आहे असे सांगत शहर विकास आघाडीकडे सत्ता देण्याचे आवाहन केले होते. पण उदय सामंत हे निवडणुकीपुरते कणकवलीत आले आणि गेले. त्यांना त्यानंतर नगरपंचायत मधील आताच्या सत्ताधाऱ्यांनी काय केले ते माहीत नसावे . यासाठीच त्यांचे याबाबत लक्ष वेधून दिले जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स फलकावरच्या त्या स्वागत शब्दातील “स्वा” हा बंद झाला होता. त्यानंतर भाजपा ने कणकवली मध्ये विरोधकांची ती गत केली होती. त्यामुळेच उदय सामंत सारख्या कॅबिनेट मंत्र्यांना कणकवली यावे लागले होते. पण आता जे शहर विकास आघाडी म्हणून सत्तेत आले त्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या 28 दिवस बंद असलेल्या या इलेक्ट्रॉनिक्स स्वागत फलकाकडे ढुंकूनही पाहिले नाही. उदय सामंत यांनी निवडणूक कालावधीमध्ये केलेल्या टीकेचा देखील त्यांना विसर पडला. आणि ते फक्त स्वाहा करण्याच्या मागे राहिले. गेले 28 दिवस हा फलक पूर्णपणे बंद असून आमच्या सत्तेच्या काळात निदान हा फलक सुरू तरी होता. पण आताच्या सत्ताधाऱ्यांनी कणकवली शहरात येणाऱ्यांचे स्वागत करण्या ऐवजी सर्व “स्वाहा” करण्याचे काम सुरू केले असल्याचा टोला नगरसेविका आर्या राणे यांनी लगावला. उदय सामंत यांनी त्यांच्या आवाहनानंतर सत्तेत आलेल्या शहर विकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांना स्वाहा करण्याऐवजी आलेल्यांचे स्वागत करणारा फलक तरी सुरू करा अशा सूचना द्याव्यात. कारण उदय सामंत यांनी दिलेल्या सूचना सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी पाळल्या नसल्याचे 28 दिवसात पाहायला मिळाले आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली





