आयकर विभागातर्फे कुडाळ येथे “प्रारंभ २०२६” चे आयोजन

नवीन आयकर कायद्याबाबत जनजागृती

नवीन आयकर कायदा २०२५ बाबत नागरिक, व्यावसायिक संस्था आणि करदात्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच नवा आयकर कायदा जो १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेला आहे, त्यात करण्यात आलेल्या व्यापक बदलांची माहिती करदात्यांपर्यंत पोचावी आणि आर्थिक नियोजनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कुडाळ येथे आयकर विभागाच्या वतीने विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला कर सल्लागार, व्यावसायिक, विविध संस्था, करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुणे येथील प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पुणे यांच्या सूचने अनुसार “प्रारंभ २०२६” या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन आज कुडाळ येथील हॉटेल लाईम लाइट सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांचे पधाधिकारी, हॉटेल व्यवसायाच्या संघटनांचे पधाधिकारी व समस्त कर सल्लागार, सनदी लेखापाल, सराफ व MIDC संघटना, वाहतूक व मालवाहतूक संघटना, विविध क्षेत्रातील व्यापारी वर्ग, सहकारी संस्था आणि बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी सी. ए. गजानन प्रभू यांनी स्वागत व पाहुण्याची ओळख करून दिली. सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. जगदीश जगताप यांनी या सत्रात नव्या आयकर कायद्याचे सविस्तर माहिती पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे उपस्थित प्रेक्षकांना करून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुडाळचे आयकर अधिकारी अजय पवार यांनी केले. यावेळी कुडाळचे सी.ए. सुनील सौदागर यांनी देखील मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात नवीन आयकर कायदा २०२५ मधील विविध तरतुदींचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व करजागृती वाढविण्यावर भर देण्यात आला. यावेळी सहभागी प्रतिनिधींनी विविध प्रश्न उपस्थित करत मतांची देवाणघेवाण केली.
संवादात्मक चर्चेमुळे करप्रणालीबाबत जागरूकता वाढविण्यास तसेच अंमलबजावणीतील व्यावहारिक अडचणी समजून घेण्यास मदत झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

error: Content is protected !!