साहित्याची साथ मिळाली, आता प्रतीक्षा विमा कवचाची !

‘सह्याद्री ऍडव्हेंचर’ची शासनाकडे आर्त हाक

खोल दऱ्या आणि काळोखे डोहही यांच्या धाडसापुढे टेकतात गुडघे

सह्याद्रीच्या खोल दऱ्या, डोंगर कपारे असोत कि नद्यांचे खोल डोह… कशाची तमा न बाळगता आणि कसलीच अपेक्षा न ठेवता संकटसमयी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते काम करतात. रेस्क्यू करतात. कोणत्या घाटात अपघात झालेला असो कि नदीच्या खोल डोहात बुडालेल्यांचा शोध घ्यायचा असो, सर्वाना आठवण होते ते आंबोली-सांगेलीच्या बाबल आल्मेडा आणि त्यांच्या सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप यांची. गेली अनेक वर्षे बाबल आल्मेडा आणि त्यांची टीम अगदी निरपेक्ष वृत्तीने हि धाडसी समाजसेवा बजावत आहे. फक्त त्यांना अपेक्षा आहे ती विमा संरक्षणाची आणि शासकीय ओळखीची.
पाऊस सुरु झाला कि सर्वाना वेध लागतात ते वर्षा पर्यटनाचे. आंबोली हे सर्व पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने पावसाळ्यात आंबोली हाऊसफुल्ल असते. शनिवार, रविवारी सुट्टीच्या दिवशी तर हजारो पर्यटक आंबोलीत गर्दी करतात. मुख्य धबधबा असो कि कावळेसाद सारखा पॉईंट असो, हि ठिकाण पर्यटकांसाठी महत्वाची असतात. मग कुठेतरी अतिउत्साह होतो आणि जीवघेणा अपघात होतो. गेल्या काही वर्षात आंबोलीत कावळेसाद या ठिकाणी दरीत पडून काही पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अशावेळी त्या खोल अंधाऱ्या दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपचे शिलेदार जीवावर उदार होऊन करत आहेत. कुठे कोणी पाण्यात बेपत्ता झाले कि शोध मोहीम राबवण्यासाठी कॉल जातो तो सह्याद्री रेस्क्यूच्याच शिलेदारांना.
बाबल आल्मेडा यांनी काही वर्षांपूर्वी हि सेवा द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला दरीतून मृतदेह वगैरे काढायचे असतील तर काही साहित्य सुद्धा नव्हत. केवळ एक मोठा दोर खांद्याला अडकवून फक्त नशिबावर आणि आपल्या कर्तृत्त्वावर भरवसा ठेवून बाबाल आणि त्यांचे सहकारी रेस्क्यू मोहिमा राबवित असत. पण २०१६-१७ मध्ये या ग्रुपचे सत्तेचाळीस सदस्य अटलबिहारी वाजपेयी माउंटेरिंग इन्स्टिट्यूट मधून मनालीला प्रशिक्षण घेऊन आले. ग्राम पंचायतीने सुद्धा काही साहित्य त्या ग्रुपला दिले होते. दोन वर्षांपूर्वी तर त्यांना सुमारे ६८ लाखाचे साहित्य मिळाले आहे. रेस्क्यू कॅम्फर व्हॅन, बोट, अंडर वॉटर कॅमेरा, अंडर वॉटर ड्रोन असे साहित्य सिंधुरत्न योजनेतून मिळाले आहे असे या ग्रुपचे सदस्य आणि पंचायत समिती सदस्य मायकेल डिसोजा यांनी सांगितले.
शासनाने आता दर्जेदार साहित्य दिले आहे. प्रशिक्षण मिळाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत सुरक्षितता वाढली आहे. पण विमा संरक्षण आणि शासकीय ओळखपत्र मिळावे अशी त्यांची मागणी आहे.
पर्यटकांनी सुद्धा मद्यपान करून पर्यटनाचा उत्साह दाखवू नये. त्यामुळे प्राणावर बेतू शकते. २०-३० वर्षाचे हे युवक कोणताही विचार न करता मजा मस्तीत तोल जाऊन दरीत कोसळतात आणि आपला जीव गमावून बसतात. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या पाठीमागे आईवडील, भाऊ-बहीण, नातेवाईक, मित्र असतात याची जाणीव ठेवून सुरक्षित पर्यटन केले पाहिजे असे आवाहन मायकेल डिसोजा यांनी केले.
याच ग्रुपचे दुसरे सदस्य संतोष पाल्येकर यांनी या रेस्क्यू दरम्यानचे अनेक अनुभव कथन केले. ते अनुभव अंगावर काटा आणणारे होते. कावळेसादची दरी वरून कमी अंतराची असली तरी त्या दरीचा तळ ४०० ते ५०० फूट खोल आहे. वरून ती खोली जाणवत नाही. त्या दरीत जीवाची पर्वा न करता खाली पडलेले मृतदेह बाहेर काढून देण्याचे काम करावे लागते असे श्री. पालयेकर यांनी सांगितले. गुरव मर्डर केसचा शोध कसा लागला याची सुद्धा त्यानी माहिती दिली.
आमदार दीपक केसरकर आणि जिल्हा प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले असल्याचे श्री. पालयेकर यांनी सांगितले. बाबल आल्मेडा यांच्या बद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. आज प्रशिक्षण आणि आधुनिक साहित्य यांच्या साहाय्याने शोध मोहिमेला मदत होत असल्याचे श्री. पालयेकर यांनी सांगितले. पर्यटन करताना पर्यटकांनी पुरेपूर काळजी घ्यावी, असे आवाहन मायकेल डिसोजा आणि संतोष पालयेकर यांनी सर्वाना केले आहे.

error: Content is protected !!