सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यवाहपदी राजू जठार यांची निवड सर्वस्तरातून अभिनंदन

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यवाह या महत्त्वाच्या पदावर आदर्श व्यापारी संघटना तळेरे या संघटनेचे कार्यकुशल नेतृत्व करणारे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ राजू जठार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
तळेरे सारख्या ग्रामीण भागातून प्रतिनिधित्व करणारे राजू जठार हे उमदे व्यक्तिमत्त्व असून सर्व क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे आणि धडाडीने काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाते. सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीत ते कार्यरत होते. ते जिल्हा महासंघाच्या बैठकीत व्यापार विषयक अनेक प्रश्नांची जाण असल्याने सातत्याने प्रश्न मांडत असतं. तसेच ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा करण्याचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून जिल्हा महासंघाने नुकत्याच नव्याने निवडलेल्या जिल्हा कार्यकारिणीत राजू जठार यांची जिल्हा कार्यवाह या पदाची महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. राजू जठार यांच्या सारख्या कृतीशील व्यक्तीची निवड करण्यात आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात व्यापार विषयक विविध योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे जिल्हा कार्यवाह राजू जठार यांनी सांगितले.
नियोजित तळेरे तालुका कृती समितीचे अध्यक्ष तसेच तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्षपद, श्री गांगेश्वर मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार समिती, श्री स्वामी समर्थ मठ, दारुम-गावडेवाडी, निसर्ग मित्र परिवार, संवाद परिवार तसेच अन्य विविध सामाजिक संस्थावरती महत्त्वाच्या पदांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर्व संस्थांमध्ये त्यांची नेहमीच सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका असते. तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळीत व उपक्रमात नेहमीच सक्रिय सहभाग असतो.
जिल्हा कार्यवाहपदी निवड करण्यात आल्यानंतर तळेरे येथे आदर्श व्यापारी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. राजू जठार यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.





