कणकवलीच्या सर्वांगीण, शाश्वत विकासाचे लक्ष

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती
ट्रॅफिक व महामार्ग कामांवर अधिकाऱ्यांसोबत आढावा
स्वच्छतेसाठी सक्शन व्हॅन व शववाहिका उपलब्ध
कणकवली शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्याच्या दृष्टीने केंद्र, राज्य व नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती देण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शासनाकडून सक्शन व्हॅन व शववाहिका उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले.
नगरपंचायतीच्या दालनात बोलताना त्यांनी माहिती दिली. यावेळी यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, गटनेता रुपेश नार्वेकर, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, बाळू पारकर, नगरसेविका प्रतीक्षा सावंत, सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, लुकेश कांबळे, नगरसेवक संजय कामतेकर, नगरसेवक राकेश राणे, बंडू हर्णे, स्वप्नील राणे, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारकर म्हणाले, शहरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासोबतच नव्या कामांनाही गती दिली जात आहे. स्वच्छ व सुंदर कणकवलीसाठी नगरपंचायतीचा स्वच्छता विभाग प्रभावी उपाययोजना राबवत आहे. सक्शन व्हॅनमुळे सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असून शववाहिकेमुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठी मदत मिळणार आहे.शासनाच्या या सुविधांबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.
दरम्यान शहरातील वाढत्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत अपूर्ण कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्यासह झालेल्या चर्चेत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी ती लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे श्री.पारकर यांनी स्पष्ट केले.
यापुढील काळात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून नगरपंचायत क्षेत्रात कोट्यवधींची विकासकामे राबविण्यात येणार असून नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.





