दळवी महाविद्यालयात १० जुलै रोजी ‘मित्र’ उपक्रमांतर्गत आनापान प्रशिक्षण शिबिर

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मित्र’ (Mind In Training for Right Awareness) उपक्रमाअंतर्गत विपश्यना विशोधन विन्यास, इगतपुरी या मातृसंस्थेच्या मार्गदर्शनाखाली, कोकणसिंधू विपश्यना सेंटर, सिंधुदुर्ग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आनापान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शुक्रवार, १० जुलै रोजी मुंबई विद्यापीठाचे विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय, तळेरे येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे.

राज्यातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी ‘मित्र’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना आनापान साधनेचे प्रशिक्षण देऊन ते पुढे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यापूर्वी अनेक शिक्षकांनी दहा दिवसांचे विपश्यना प्रशिक्षण पूर्ण केले असून, उर्वरित शिक्षकांसाठी तीन तासांचे आनापान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण शिबिरात मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यांतील सर्व केंद्रप्रमुख सहभागी होणार असून, प्रशिक्षणानंतर ते आपल्या केंद्रांतील शिक्षकांना आनापान साधनेचे प्रशिक्षण देतील. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, मानसिक स्थैर्य, आत्मशिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग चे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी संबंधित केंद्रप्रमुखांनी प्रशिक्षणास वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून, प्रशिक्षणार्थींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

error: Content is protected !!