गुगल सर्च तंत्राच्या साहाय्याने हरवलेल्या बौद्धिक दिव्यांग अल्पवयीन मुलीचे कुटुंबाशी यशस्वी पुनर्मीलन

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील अल्पवयीन बौद्धिक दिव्यांग मुलगी तब्बल ११ महिन्यांनंतर सुखरूप कुटुंबात परतली
करुणा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा उत्कृष्ट संगम घडवत जीवन आनंद संस्थेने बिहार राज्यातील भोजपूर जिल्ह्यातील हरवलेल्या एका अल्पवयीन बौद्धिक दिव्यांग मुलीचे तब्बल अकरा महिन्यांनंतर तिच्या कुटुंबाशी यशस्वी पुनर्मीलन घडवून आणले.
सुमारे १५ वर्षीय ही मुलगी ऑगस्ट २०२५ मध्ये कुडाळ तालुक्यातील खुटवळ-घावनळे परिसरात निराधार अवस्थेत भटकताना आढळून आली होती. स्थानिक पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनंतर कुडाळ पोलिसांनी तिची सुटका केली. त्यानंतर Child Welfare Committee, Sindhudurg यांच्या आदेशानुसार तिची संरक्षण, संगोपन आणि पुनर्वसनासाठी संविता आश्रमात रवानगी करण्यात आली.
ही मुलगी बौद्धिक दिव्यांग असून तिच्यामध्ये मानसिक आजाराचीही लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे ती स्वतःची ओळख, पत्ता किंवा कुटुंबाविषयीची माहिती स्पष्टपणे सांगू शकत नव्हती.
या सर्व अडचणींवर मात करत संविता आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक महिने संयमाने तिच्याशी संवाद साधला. तिच्याकडून मिळालेल्या अत्यल्प धागेदोऱ्यांच्या आधारे आणि नाविन्यपूर्ण गुगल सर्च तंत्राचा वापर करून जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे तसेच संविता आश्रमाच्या टीमने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. अखेर जवळपास अकरा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर मुलीचे मूळ गाव आणि भोजपूर (बिहार) येथील तिचे कुटुंब शोधण्यात यश आले.
या शोध व पडताळणी प्रक्रियेत भोजपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, स्थानिक शाळेतील शिक्षक, Punita Singh, तसेच Ara Town Police Station आणि Nawada Police Station यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या समन्वित प्रयत्नांमुळे मुलीची ओळख निश्चित करण्यात आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यात यश मिळाले.
कुटुंबाचा शोध लागल्यानंतर मुलीचे वडील आणि आजोबा बिहारहून संविता आश्रमात आले. आवश्यक ओळखपत्रांची पडताळणी आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर Child Welfare Committee, Sindhudurg यांनी मुलीचा अधिकृत ताबा तिच्या कुटुंबाकडे सुपूर्द केला.
संविता आश्रमातील वास्तव्यात आश्रमातील परिचारिका, सेवक, पुनर्वसन कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी तिची सुरक्षितता, वैद्यकीय उपचार आणि सर्वांगीण काळजी अत्यंत संवेदनशीलतेने घेतली.
आपल्या मुलीची इतक्या जिव्हाळ्याने आणि सन्मानाने काळजी घेतल्याबद्दल मुलीच्या पालकांनी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब आणि संपूर्ण आश्रम परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले.
या संपूर्ण कुटुंब पुनर्मीलन प्रक्रियेत आश्रम व्यवस्थापक देऊ सावंत तसेच समन्वयक शैलेन्द्र कदम, विजया कांबळी आणि मयुरी गावडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हरवलेल्या आणि असुरक्षित बालकांना पुन्हा त्यांच्या कुटुंबाच्या प्रेमळ संरक्षणात पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सातत्यपूर्ण शोधकार्य, आंतरराज्य समन्वय आणि मानवतावादी सेवाभाव यांचा प्रभावी संगम किती महत्त्वाचा ठरू शकतो, याचे हे पुनर्मीलन प्रेरणादायी उदाहरण आहे.






