पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर ‘भरणी, आयनल, चाफेड’चा वीजपुरवठा अखेर सुरळीत

महावितरणकडून युद्धपातळीवर काम पूर्ण
ग्रामस्थांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार
वादळी वाऱ्यामुळे मुख्य वीज वाहिनीचे आठ पोल कोसळल्याने अंधारात असलेल्या भरणी, आयनल आणि चाफेड या तीनही गावांचा वीजपुरवठा अखेर बुधवारी रात्री उशिरा सुरळीत झाला आहे. या गंभीर समस्येची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिल्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. अखेर महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे या तिन्ही गावांना दिलासा मिळाला आहे.
जोरदार झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आयनल जंगलातील मुख्य वीज वाहिनीचे तब्बल आठ लोखंडी पोल कोसळले होते. हे पोल बरीच वर्षे जुने व गंजलेले असल्याने, तसेच त्यांची वीज वितरण कंपनीकडून वेळोवेळी योग्य देखभाल न झाल्यामुळे ते मोडून पडले आणि तिन्ही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. जंगलातील दुर्गम भागात पोल कोसळल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर निर्माण झाले होते. या समस्येची माहिती मिळताच पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने जिल्ह्याचे महावितरण विभागाचे अधीक्षक अभियंता राक यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याचे आदेश दिले.
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर महावितरणची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली. मंगळवारी रात्रीच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला. जंगलातील वीज वाहिन्यांची अडचण लक्षात घेता, आयनल गावचे रहिवाशी आणि स्थानिक जमीन मालक प्रवीण साठम यांनी मोठे औदार्य दाखवले. त्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या आपल्या खासगी जमिनीतून वीज पोल उभारून विद्युत वाहिन्या नेण्यास महावितरणला परवानगी दिली. यामुळे अत्यंत सोयीच्या आणि सुलभ मार्गाने नवीन पोल उभे करून वीज वाहिन्या जोडण्याचे काम वेगाने पूर्ण करता आले.
या दुरुस्ती कामाच्या वेळी घटनास्थळी नांदगाव सब स्टेशनचे अधिकारी बिडकर स्वतः जातीने उपस्थित राहून कामावर देखरेख ठेवून होते. तर कणकवलीचे कार्यकारी अभियंता सातत्याने संपर्कात राहून कामाचा आढावा घेत होते. प्रशासकीय पातळीवर कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनीही कामाचा आढावा घेतला, तर भाजपा युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता.
या महत्त्वपूर्ण मोहिमेदरम्यान भरणीचे सरपंच अनिल बागवे, चाफेडचे सरपंच साहिल मेस्त्री, आयनलच्या सरपंच सिद्धी दहिबावकर यांच्यासह भरणीचे पोलीसपाटील लक्ष्मीकांत ताम्हणकर, आयनलचे पोलीसपाटील दीपक चव्हाण, तसेच पांडू मसुरकर, संतोष वायंगणकर, देवेंद्र दहिबावकर, राजू पडवळ आणि आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांच्यासह तिन्ही गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक ग्रामस्थांनीही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कामात मोलाची मदत केली. अखेर बुधवारी रात्री तिन्ही गावातील वीज दिवे पुन्हा उजळले असून, मोठी समस्या सुटल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.






