पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्याकडून नडगिवे शाळा क्र. १ ला टॅब भेट

तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत, या सामाजिक भावनेतून पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे शाळा क्र. १ ला ‘टॅब’ प्रदान केला.
खारेपाटण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शिंदे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळेत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात हा टॅब हस्तांतरित करण्यात आला. यावेळी सरपंच माधवी मण्यार, उपसरपंच भूषण कांबळे, माजी सरपंच अमित मांजरेकर, ग्रामपंचायत सदस्य लता हिवाळकर, पोलीस पाटील जितेंद्र मण्यार, व्यवस्थापन समितीचे रवींद्र सुतार, उपाध्यक्षा साक्षी आंबेरकर, ब्रम्हदंडे, मुख्याध्यापिका अनिता पाटकर, प्रभा अकीवाटे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना गुरुप्रसाद शिंदे म्हणाले की, “सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान असणे अनिवार्य आहे. शालेय स्तरापासूनच हे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून आपले भविष्य उज्ज्वल घडवू शकतील.”
सरपंच माधवी मण्यार आणि उपसरपंच भूषण कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शाळेची शैक्षणिक वाटचाल उत्कृष्ट असून डिजिटल साधनांच्या वापरामुळे गुणवत्तेत अधिक भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जान्हवी परब यांनी मानले.





