कणकवली पंचायत समिती सभापती पदासाठी हर्षदा वाळके यांचे नाव निश्चित

उपसभापती पदासाठी राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब
कणकवली पंचायत समितीमध्ये सर्वच सदस्य आहेत महायुतीचे
कणकवली पंचायत समिती सभापती, उपसभापती निवड आज होणार असून या निवडीसाठी भाजपाकडून नावे जवळपास निश्चित झाली आहेत. यामध्ये सभापती पदासाठी नांदगाव पंचायत समितीच्या बिनविरोध निवडून आलेल्या सदस्या हर्षदा वाळके तर उपसभापतीसाठी वरवडे पंचायत समिती चे सदस्य राजेश उर्फ सोनू सावंत यांची नावे निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. काही वेळातच भाजपा कडून अधिकृतरित्या ही नावे जाहीर केली जाणार आहेत. या पंचायत समितीमध्ये 16 पैकी सर्वच सदस्य हे भाजपा शिवसेना महायुतीचे असल्याने या निवडी बिनविरोधच होणार असल्याचे स्पष्ट आहे. कणकवली पंचायत समितीमध्ये हर्षदा वाळके यांनी यापूर्वी सदस्य म्हणून काम केले असून राजेश उर्फ सोनू सावंत यांच्या पत्नी यापूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. हे दोन्ही संभाव्य पदाधिकारी कट्टर राणे समर्थक मानले जात असताना या पंचायत समिती च्या कारभाराची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली जाणार असल्याचे निश्चित झाल्याचे समजते. 9 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत सभापती, उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत. दुपारी 3 वाजता प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाणार आहे. दुपारी 3 ते 3. 15 वाजेपर्यंत वैध उमेदवारांची नावे घोषित केले जाणार आहेत. दुपारी 3. 16 ते 3.30 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेणे, दुपारी 3. 31 ते 3:45 वाजेपर्यंत वैध नामनिर्देशन पत्रांच्या उमेदवारांची नावे घोषित करणे, दुपारी 3.45 वाजल्यापासून मतदान घेणे व त्यानंतर मतमोजणी व निकाल जाहीर करणे असा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करून दिला आहे. सभापती पदाची निवडणूक झाल्यानंतर लगेचच उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे.





