ज्ञानेश कुमारांचा राजीनामा न झाल्यास वैभववाडीत आंदोलन छेडणार

ठाकरे सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा
लोकशाही टिकवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक; सर्वपक्षीयांचे तहसीलदारांना निवेदन
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, तसेच निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि घटनात्मक स्वायत्तता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, या प्रमुख मागण्यांसह सर्वपक्षीयांच्या वतीने तहसीलदार सूर्यकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाकरे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी, “जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मतचोरी थांबणार नाही. लोकशाही टिकवण्यासाठी त्यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. राजीनामा न झाल्यास जनता रस्त्यावर उतरेल आणि वैभववाडीतही आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला.
यावेळी बोलताना सुशांत नाईक म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलने सुरू आहेत. निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे. लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील सत्ताधारी हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही नाईक यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांना जनतेने बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा न दिल्यास येत्या काळात वैभववाडीतही आंदोलन छेडले जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
या निवेदनप्रसंगी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नंदू शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, दिव्या पाचकुडे, लक्ष्मण रावराणे, प्रसाद नारकर, गुलजार काझी, रोहित पावसकर, बंडू सावंत, अनिल नरम, जितेंद्र तळेकर, बाबा मोरे आदी उपस्थित होते.






