महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सोनसाखळी चोरी आणि जबरी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक​

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून सोनसाखळी चोरी व जबरी चोरी करणाऱ्या एका सराईत चोराला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. पद्मनाभ रामचंद्र कसाळकर (वय ४७ वर्षे, रा. MIDC, वरची कुंभारवाडी, ता. कुडाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक १२.१०.२०२६ रोजी सायंकाळी पावशी बेलनदि वाडी येथील सौ. अनिता अशोक अंबाडी (वय ५०) या कुडाळकडे जाण्यासाठी पावशी बेलनदीवाडी येथे उभ्या असताना, एका इसमाने घावनळे मठाकडे जाणारा रस्ता कुठे आहे असे दिशा विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ जबरदस्तीने खेचून तोडून पळ काढला होता. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, यापूर्वी दिनांक ०९.०९.२०२६ रोजी येथील सराफदारवाडी येथेही एका वृद्ध महिलेच्या घराचा दरवाजा उघडून तिच्या तोंडावर स्प्रे मारून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल होता.
वाढत्या चोऱ्यांच्या घटना गांभीर्याने लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.
​पोलीस पथकाने फिर्यादींकडून मिळालेले अज्ञातांचे वर्णन, बोलीभाषा आणि गुन्ह्याच्या वेळी वापरलेल्या वाहनाची माहिती गोळा केली. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी MIDC कुडाळ परिसरातून संशयित आरोपीला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

पोलिसांनी आरोपीकडून एकूण १५,५00/- रुपये रोख रक्कम, गुन्ह्यासाठी वापरलेली १,५०,०००/- रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची अपाचे आर-१६० दुचाकी, तसेच हेल्मेट व पेन रिलिफ स्प्रे मुद्देमाल हस्तगत केला आहे.
​सदर यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक श्री. हनुमंत भोसले आणि पोलीस अंमलदार सदानंद राणे, डॉमिनिक डिसोझा, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार, अविनाश ओटवणेकर व अमर कांडर यांनी केली असून, त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!