कुडाळ न.प.च्या ३७.९७ लाखाच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी

शहर विकासासाठी अनेक महत्त्वपुर्ण तरतुदी
कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत आरोग्य, पाणी, क्रिडा, स्वच्छता, महिला व बालकल्याण, दिव्यांग बांधव सक्षमीकरण तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठींची तरतुद केलेले २०२६-२७ आर्थिक वर्षाचे शिल्लकी रक्कमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर शिरवलकर यांनी सभागृहात सादर केले. सदर अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
कुडाळ नगरपंचायतीची विशेष सभा मंगळवार दिनांक २४/०२/२०२६ रोजी नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका तसेच मुख्याधिकारी विनायक औंधकर व सर्व विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल स्वप्निल पाटील यांनी केले.
या अंदाजपत्रकाची प्रारंभिक शिल्लक ३७ कोटी ८१ लक्ष ५९ हजार ८४८ रुपये एवढी आली आहे. तर एकूण महसुली जमा १० कोटी ३० लक्ष ५२ हजार ५०० आली आहे. तर एकूण महसुली खर्च १० कोटी २७ लक्ष ४१ हजार ७४९ आहे. भांडवली जमा २५ कोटी ४४ लक्ष ५६ हजार ५०० व भांडवली खर्च २५ कोटी ३२ लक्ष १८ हजार ५०० आला आहे. अखेर ३७ कोटी ९७ लक्ष ०८ हजार ५९९ शिलकी रक्कमेचा अर्थसंकल्प सर्वानुमते संमत करण्यात आला.
या अर्थसंकल्पात चौक सुशोभिकरण, मुख्य रस्ते कॉक्रीटिकरण, शहर प्रवेशद्वार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जलतरण तलाव, कचरा डेपो, नाट्यगृह बांधकाम, हायमास्ट खरेदीसाठी, पाणी योजनासाठी, सक्शन मशीनसाठी, रस्ता दुरुस्तीसाठी, नवीन कचरा संकलन वाहने खरेदीसाठी, भाजी मार्केट, सुसज्ज जिमखाना, नाना-नानी पार्क, बायोगॅस प्लॅन्ट, नवीन उद्यान, मल्लनिस्सारण योजना, मच्छी मार्केट, शहर विकासासाठी अनेक महत्त्वपुर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच सन २०२६-२७ आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक कुडाळ शहरातील नागरिकांना पाहण्यासाठी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहे, अशी माहीती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली.





