विज्ञानाच्या मंचावर मानवतेचा जागर!

कणकवलीत ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’निमित्त सिंधूताई सपकाळ यांना आगळीवेगळी आदरांजली

​कणकवली/मयूर ठाकूर विज्ञानाची कास धरतानाच सामाजिक बांधिलकीचे भान जपणारा एक अभूतपूर्व सोहळा ‘ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल’ आणि ‘सोमस्थ अकॅडमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.‘राष्ट्रीय विज्ञान दिना’चे.औचित्य साधून थोर समाजसेविका,’अनाथांची माय’ सिंधूताई सपकाळ यांची भव्य प्रतिमा साकारण्यात येणार आहे.
​केवळ औपचारिकता न पाळता,विज्ञानाच्या या उत्सवाला मानवतेची जोड देण्यात आली आहे.जिल्ह्यातील वृद्धाश्रमामधील वृद्धांच्या उपस्थितीत,टॉवेल आणि साड्यांच्या साहाय्याने सिंधूताईंची प्रतिमा साकारून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.विज्ञानाच्या प्रगतीसोबतच समाजातील उपेक्षित घटकांना सन्मान देण्याचा हा प्रयत्न सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.​दिनांक: २७ फेब्रुवारी २०२६ रोजी या कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन केले असून सकाळी १०.०० वाजता आयडीयल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स,वरवडे,ता. कणकवली,जि.सिंधुदुर्ग येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
​समाजसेवेला बळ देण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी एक QR कोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.प्रत्येक लहान योगदान सामाजिक परिवर्तनासाठी मोलाचे ठरेल,असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.तसेच या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत बोलताना ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सचिव हरिभाऊ भिसे आणि सहसचिव निलेश महेंद्रकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!