प्रस्तावित विद्युत वाहिनी हटवली नाही तर आंदोलन

वेंगुर्लेकरवाडी आणि पिंगुळीतील रहिवाशांचा इशारा

कुडाळ : शहरातील वेंगुर्लेकरवाडी तसेच पिंगुळी उत्कर्ष नगर, संकल्प नगर, सराफदारवाडी राऊळवाडी आणि पिंगुळी येथून प्रस्तावित असलेल्या कुडाळ इन्सुली नवीन विद्युत वाहिनी (132 kv) ला तेथील रहिवाशांनी विरोध केला आहे. त्या आशयाचे निवेदन रहिवाशांनी कोल्हापूर विभाग सुप्रीटेंडंट इंजिनियर अभिजीत ढमाले यांना दिले. ही प्रस्तावित विद्युत वाहिनी हलवली नाही तर आंदोलनाचा इशारा या रहिवाशांनी दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे, सर्व ग्रामस्थ आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की कुडाळ वेंगुर्लेकरवाडी, पिंगुळी उत्कर्ष नगर, संकल्पनगर, सराफदारवाडी, राउळवाडी, टेंबधुरी नगर पिंगुळी गावातून कुडाळ इन्सुली नवीन प्रस्तावित विद्युत वाहिनी (132 kv) भविष्यात जाणार आहे अशी बातमी आम्हा सर्व ग्रामस्थांना समजली आहे. या अगोदर कोकण रेल्वेसाठी आमच्या जागा घेतलेल्या आहेत. तसेच अन्य प्रकल्पांसाठी पण जागा गेलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ भूमिहीन (अल्पभूधारक) आहोत. आता जी काही शिल्लक तुटपुंजी जागा आहे, त्या ठिकाणी आमची राहती घरे व उदरनिर्वाहासाठी आंबा, काजू, नारळ, सुपारी ही झाडे आहेत. स्थानिक ग्रामस्थांना विचारात न घेता मुख्य वीज वाहिनी जाणार असे झाल्यास आमच्यावर मोठा अन्याय होणार आहे. या जागेव्यतिरिक्त आमच्याकडे कोणतेही जागा नाही.
त्यामुळे या प्रकारचे कोणतेही काम हाती घेतल्यास आम्हा सर्वांकडून त्यास विरोध दर्शविला जाणार आहे आणि वेळ पडल्यास आंदोलनही केले जाणार आहे, याची पूर्वकल्पना आम्ही आमच्या निवेदनातून आपणास देत आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी निलेश प्रभू, वैभव पाटकर, धीरज परब, शशांक पिंगुळकर, किरण शिंदे, विजय वेंगुर्लेकर, संदीप वेंगुर्लेकर, प्रणिल वेतुरेकर, आलिशा वेतुरेकर, विलास पावसकर, मिलिंद परब, चित्तरंजन सावंत, तसेच वेंगुर्लेकर वाडी ग्रामस्थ आणि पिंगुळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!