राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत कवी किशोर कदम यांना पारितोषिक

मुंबई काव्य मालाड संस्थेतर्फे गौरव

 सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा ओसरगाव शाळा नंबर 1 चे मुख्याध्यापक कवी किशोर कदम यांना मुंबई मालाड येथील काव्य मालाड या संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.1500 रुपये आणि स्मृतिचिन्ह, शाल असे पारितोषिकाचे स्वरूप असून कवी कदम यांच्या बाप कवितेचा या पारितोषिकाने गौरव करण्यात आला आहे. 
    काव्य मालाड ही साहित्यिक संस्था गेली अनेक वर्ष राज्यस्तरीय काव्य स्पर्धा आयोजित करते. यावर्षीच्या काव्य स्पर्धेत 65 कवीनी सहभाग घेतला होता.यात किशोर कदम यांच्या 'बाप ' या कवितेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. किशोर कदम हे सिंधुदुर्गच्या साहित्य चळवळीत सक्रिय कार्यरत असून नव्या लेखक कवीना मंच उपलब्ध व्हावा म्हणून सम्यक संबोधी साहित्य संस्था त्यांनी चालू केली आहे. त्याचबरोबर या संस्थेतर्फे दरवर्षी एकदिवसीय साहित्य संमेलन ते आयोजित करत असून बाबुराव बागुल आणि नामदेव ढसाळ यांच्या स्मरणार्थ त्यांनी राज्यस्तरीय काव्य स्पर्धाही या संस्थेतर्फे चालू केली आहे. सम्यक संबोधी हा राज्यस्तरीय काव्य पुरस्कार ते दरवर्षी देत असतात. त्यांचा एक बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाला असून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखमाला हे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या राज्यस्तरीय पारितोषिकाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य संस्कृती चळवळीतून किशोर कदम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!