वेताळबांबर्डे कदमवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका
तालुक्यातील वेताळ बांबर्डे कदमवाडी-नळ्याचा पाचा येथील एका सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाच्या तत्परतेमुळे या बिबट्याची सुखरूप सुटका करून, आवश्यक त्या उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाडी-नळ्याचा पाचा येथील सार्वजनिक विहिरीजवळ आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक नाग्या म्हादू वसतिगृहाचे प्रमुख उदय आईर हे गेले होते. त्यावेळी त्यांना विहिरीतून वन्यप्राण्याच्या ओरडण्याचा मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यात एक बिबट्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. उदय आईर यांनी तातडीने या घटनेची माहिती कुडाळ वनविभाग कार्यालय आणि स्थानिक ग्रामस्थांना दिली. बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कुडाळचे वनअधिकारी आणि जलद बचाव पथक (RRT) पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची खोली आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन टीमने अत्यंत शिताफीने विहिरीत पिंजरा सोडला. काही वेळातच बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा बिबट्या साधारण अडीच वर्षांचा असून भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीकडे आला असावा आणि अंधारात अंदाज न आल्याने विहिरीत पडला असावा.
हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन उप वनसंरक्षक मिलिश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत सहाय्यक वनसंरक्षक एस. के. लाड, कुडाळचे वनक्षेत्रपाल चेतन पाटील, वनपाल सूर्यकांत सावंत, वनपाल प्रकाश पाटील, वनरक्षक समीर खरवत, प्रसाद पाटील, अनिकेत माने आणि स्वप्नील सव्हाशे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच जलद बचाव पथकाचे (आरआरटी कुडाळ) दिवाकर बांबर्डेकर, प्रसाद गावडे, अनिल गावडे, वैभव अमृस्कर, सुशांत करंगुटकर, धनंजय मेस्त्री आणि चालक राहुल मयेकर यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
बिबट्या विहिरीत पडल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. या धडपडीत विहिरीत असलेले स्थानिक नागरिक उदय आईर, मोहन कदम, संतोष पानवलकर, आकाश पावसकर, चंद्रकांत मेजारी आणि दुर्गादास झोरे यांच्या पाण्याच्या पंपांचे (मोटारींचे) आणि पाईप्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, अशा घटनांनंतर जिल्ह्याचा वनविभाग अत्यंत सतर्क असून, कोणतीही माहिती मिळताच जलद बचाव पथक (रेस्क्यू टीम) तात्काळ घटनास्थळी पोहोचून प्राण्यांना व नागरिकांना सुरक्षितता प्रदान करत आहे, अशी प्रतिक्रिया वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी दिली.






