खारेपाटण महाविद्यालयाचा NCC परेड स्पर्धेत द्वितीय क्रमांक

तरळे येथील विजयालक्ष्मी दळवी कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन NCC परेड स्पर्धेत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटणच्या कॅडेट्सनी शिस्त, समन्वय आणि उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील NCC पथकांनी सहभाग घेतला होता. खारेपाटण महाविद्यालयाच्या कॅडेट्सनी प्रभावी मार्चिंग, अचूक कमांड, शिस्तबद्ध हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण परेड सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या यशासाठी NCC अधिकारी प्रा . गजानन व्हंकळी या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन तसेच कॅडेट्सचा कठोर सराव आणि टीमवर्क महत्त्वाचा ठरला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी विजयी कॅडेट्सचे अभिनंदन करताना सांगितले की, “NCC विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नेतृत्वगुण आणि शिस्त निर्माण करते. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे.”
या उल्लेखनीय कामगिरीमुळे खारेपाटण महाविद्यालयाचे नाव पुन्हा एकदा जिल्हा पातळीवर उजळले असून, भविष्यातही अशीच उज्ज्वल यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.





