…अखेर सिंधुदुर्गात शिवसेना–भाजप युतीचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला?

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबतच्या बैठकीनंतर भूमिका निश्चित करण्याची शक्यता

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेकडे असणार लक्ष

नगरपालिका निवडणुकीमध्ये आमने-सामने ठाकलेले सिंधुदुर्गातील भाजपा आणि शिवसेना ही दोन्ही पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे. नुकताच या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय झाल्याचे समजते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना–भाजप युतीचा जागावाटपाचा फार्म्युला अखेर निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 50 जागांवर युतीचा निर्णय घेण्यात आला असून, त्यापैकी भाजप 30 तर शिवसेना 20 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर याच धर्तीवर पंचायत समिती स्तरावर देखील युती होणार असल्याचे समजते. यामध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजप 16 तर शिवसेना 2 जागेवर चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. तर कुडाळ–मालवण मतदारसंघात शिवसेनेला 11 तर भाजपला 4 जागा देण्यात येणार असल्याचे समजते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजप 9 तर शिवसेना 8 जागांवर युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्या बाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र उद्या माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीच्या कणकवलीत होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये याबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा देखील केली जाईल. परंतु या फॉर्मुल्यात काही प्रमाणात बदलही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र एकीकडे हा फॉर्मुला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मान्य असणार का? त्यांची या युती बाबत काय भूमिका असणार? ते पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!