रत्नागिरीत ‘GDCA’ आणि ‘CHM’ परीक्षा केंद्राला मान्यता

तब्बल २० वर्षांच्या प्रदीर्घ पाठपुराव्याला यश
स्वावलंबी भारत अभियानाचे कोकण प्रांत समन्वयक अनिकेत वालावलकर यांची माहिती
कोकणच्या सहकार चळवळीला नवसंजीवनी देणारा आणि गेली दोन दशके प्रलंबित असलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय अखेर मार्गी लागला आहे. सहकार क्षेत्रातील अतीमहत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘GDCA’ (सहकारी पदविका) आणि ‘CHM’ (गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन) परीक्षांसाठी आता रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र केंद्र मंजूर झाले आहे. येत्या मे २०२६ च्या परीक्षेपासून हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. पुणे सहकार आयुक्त कार्यालयाने यावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने कोकणच्या वाट्याला आलेल्या २० वर्षांच्या लढ्याला यश आले आहे.
लालफितीचा विळखा आणि युवकांचे हाल
आजवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना या परीक्षांसाठी मुंबई किंवा कोल्हापूरच्या वाटा तुडवाव्या लागत होत्या. २००५ सालापासून सुरू असलेला एक भगीरथ प्रयत्न आहे. बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उमेश गाळवणकर यांनी दिलेले पहिले निवेदन आणि त्यानंतर सहकार भारती रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन संपर्क प्रमुख व स्वावलंबी भारत अभियानाचे सद्य कोकण प्रांत समन्वयक श्री अनिकेत रवींद्र वालावलकर यांनी विविध संघटनांच्या माध्यमातून केलेला पाठपुरावा याला यश आले आहे. कोकण प्रांत समन्वयक (स्वावलंबी भारत अभियान) अनिकेत रवींद्र वालावलकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.





