शासकीय सुट्टी दिवशी देखील शहरातील विकास कामांच्या आढाव्यासाठी संदेश पारकर “ऑन फिल्ड”

कणकवली शहरातील प्रलंबित रिंग रोडच्या कामाचा घेतला आढावा
शहरवासीयांना विश्वासात घेऊन अपेक्षित विकास करणार
कणकवली शहरातील रिंग रोड चे प्रलंबित असलेले काम शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावा. या जमीन मालकांच्या काही अडचणी असतील त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. रिंग रोड करताना त्याचा दर्जा व रोड अंतर्गत होणारी गटारे याची गुणवत्ता राखली गेली पाहिजे. तसेच रिंग रोडचे काम करत असताना ज्या ठिकाणी दुकाने आहेत अशा ठिकाणी दुकानांमध्ये ग्राहकांना ये –जा करण्याकरिता सुस्थितीत असा मार्ग ठेवा. अशा सूचना देत कणकवली चे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज शनिवारी शासकीय सुट्टी दिवशी देखील ऑन फिल्ड येत शहर विकासाच्या कामांचा आढावा घेतला.
कणकवली रवळनाथ मंदिर ते गांगो मंदिर पर्यंतच्या रिंग रोडच्या कामाचा स्वतः फिरून आढावा घेत असताना यावेळी त्यांच्यासोबत अभियंता सचिन नेरकर, तेजस राणे, ठेकेदार प्रतिनिधी जावेद शेख यांच्यासह अन्य उपस्थित होते. रिंग रोड ची पाहणी करत असताना रवळनाथ मंदिर ते धुरी घर पर्यंत व तेथून सुतारवाडी पर्यंतच्या कामाची पाहणी करत श्री पारकर यांनी अंदाजपत्रका प्रमाणे कामाच्या स्थितीचा आढावा घेतला. तसेच सुतारवाडी च्या दरम्यान काही ठिकाणी पावसाळ्यात चिखल होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असा मुद्दा तेथील काही नागरिकांनी मांडल्यानंतर पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करून दिले जाईल असे आश्वासन त्यांनी येथील नागरिकांना दिले. रवळनाथ मंदिर ते चौंडेश्वरी मंदिरापर्यंत असणारी रिंग रोडच्या गटाराची कामे दर्जेदार करा अशा सूचना श्री पारकर यांनी दिल्या. चौंडेश्वरी मंदिराच्या पुढील भागामध्ये काही ठिकाणी भूसंपादन प्रक्रियेची समस्या असल्याने या ठिकाणी काही जमीन मालकांशी श्री पारकर यांनी त्यावेळी संवाद साधला. रिंग रोड मध्ये ज्यांची घरे व मालमत्ता बाधित होत आहेत त्यांच्या नेमक्या काय अडचणी आहेत व याबाबत चर्चेतून काय मार्ग काढता येईल याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे देखील श्री पारकर यांनी सांगितले.
दिगंबर वालावलकर कणकवली





