विद्यार्थीदशेत शाळेने केलेले कौतुक ऊर्जा देणारी शिदोरी – विठोबा सराफ

लक्ष्मी नारायण विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात
आपले आईवडील ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत आपल्याला शिकायला मिळणे यासारखी दुसरी आनंददायी गोष्ट नाही. तोच आनंद उराशी बाळगून मन लावून शिका. प्रगती करा. तुमच्या पाठीवर तुमच्या शाळेची कौतुकाची थाप निश्चित पडेल. विद्यार्थीदशेत शाळेने केलेले कौतुक ऊर्जा देणारी शिदोरी असते, असे प्रतिपादन सराफ ॲग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि स्वरुप आरोग्य आणि जीवन फाऊंडेशनचे प्रवर्तक विठोबा सराफ यांनी बिबवणे येथे केले. बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक समारंभ व स्नेहसंमेलन शुक्रवारी विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात झाले. बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष राजाराम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला विठोबा सऱाफ (मांडकुली) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर बिबवणेच्या सरपंच व पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सृष्टी कुडपकर, संस्थेचे उपाध्यक्ष आनंद गावडे, सचिव प्रकाश कुबल, खजिनदार भरत सामंत, सहसचिव विठ्ठल माळकर, संचालक रमाकांत चव्हाण,, वामन सावंत व वामन राऊळ, मुख्याध्यापक भास्कर पारधी,बिबवणे ग्रामपंचायत सदस्या आर्या मार्गी, पालक शिक्षक –संघाचे सदस्य वसंत बिबवणेकर, महेद्र मेस्त्री तसेच पालक प्रतिनिधी पूर्वा नाईक, विष्णू शिरोडकर, प्रणव सुद्रीक, विद्यालयाच्या स्वराज्य सभेच्या मुख्यमंत्री आर्या लोके आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.सराफ म्हणाले, तुम्ही विद्यार्थी खूप भाग्यवान आहात. या विद्यालयाची संस्था तुमच्या प्रगतीबाबत जागरुक आहे. तुम्ही आनंददायी शिक्षण घ्यावे.महाराष्टात विद्यालय आदर्श ठरावे हे स्वप्न उराशी बाळगून संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक जे कष्ट घेत आहेत त्याला तोड नाही. तुम्ही चांगला अभ्यास करा.प्रगती करुन विद्यालयाचे स्वप्न पूर्ण करा,असे सांगितले .या विद्यालयाच्या नवीन इमारत उभारणीच्या कामासाठी २५ हजार रु.ची देणगी जाहीर करून संस्थाध्यक्ष श्री. सावंत यांच्याकडे धनादेशही सुपुर्द केला. याप्रसंगी संस्था आणि विद्यालयाच्यावतीने श्री सराफ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राजाराम सावंत म्हणाले, आमच्या विद्यालयातील तुम्हा विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता अफाट आहे. तिला योग्य पैलू पाडण्याचे काम विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक सर्वोतोपरी पूर्ण क्षमतेने करीत आहेत. ही जबाबदारी पार पाडण्यात सर्वोत्तम यश मिळावे यासाठी संस्था आवश्यक भौतिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ग्रामीण भागातील शाळेचा आदर्श कायापालट करणे हे आव्हान असले, तरी श्री.सराफ यांच्यासारखी या मातीतली अनेक दातृत्वशील व्यक्ती सोबत आली. येत आहेत. त्यामुळेच आमचा संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी होत आहोत. तुम्ही विद्यार्थ्यांनी याचे भान ठेवून आपले विद्यालय महाराष्ट्रात आदर्श ठरेल ,अशी प्रगती करा, असे आवाहन त्यांनी केले. प्रकाश कुबल, वामन सावंत व आनंद गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी संस्था प्रयत्न करीत असून विद्यार्थांनी अभ्यास करून या विद्यालयाचे नाव उज्वल करावे,असे आवाहन त्यांनी केले.
विद्यालयातील गुणवंत तसेच कला क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ‘लोकरंग’ या विद्यालयाच्या हस्तलिखित विशेषांकाचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्रातील लोककला आणि संस्कृतीची माहिती देणारे हस्तलिखित विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. विद्यार्थांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी संस्था प्रयत्न करीत असून विद्यार्थांनी अभ्यास करून या विद्यालयाचे नाव उज्वल करावे,असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक भास्कर पारधी यांनी व सूत्रसंचालन सहायक शिक्षक अंकुश कदम यांनी, अहवाल वाचन सहायक शिक्षिका सौ.कनक कुडतरकर यांनी, तर पारितोषिक वितरण वाचन सहाय्यक शिक्षिका सौ. स्नेहा परब यांनी केले. आभार सहायक शिक्षक शशिकांत पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे अन्य शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





