संजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्याच बैठकीत तब्बल 51 प्रकरणांना मंजुरी

अध्यक्षपदी शरद कर्ले यांची निवड झाल्याबद्दल तहसीलदारांनी केले अभिनंदन

उत्पन्नाची मर्यादा 21 हजारा पेक्षा वाढवण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करणार

कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी शरद कर्ले यांची निवड झाली आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी या निवडीबद्दल श्री.कर्ले यांचे अभिनंदन केले. दरम्‍यान आजच्या समितीच्या पहिल्‍याच बैठकीत एकूण ५१ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार समितीची बैठक शरद कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्यासह समितीचे सदस्य सुजाता हळदिवे, गौतम खुडकर, विजय कतरूड, दीपक दळवी, भगवान दळवी आदी उपस्थित होते. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ३४, श्रावणबाळ राज्‍य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत १३ तर राष्‍ट्रीय वृद्धापकाळ योजनेंतर्गत ४ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
तालुक्‍यातील अनेक गरीब कुटुंबांना संजय गांधी निराधार योजना, राष्‍ट्रीय वृद्धापकाळ आणि श्रावणबाळ निवृतीवेतन योजनेची माहिती नाही. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी येत्‍या २६ जानेवारीच्या ग्रामसभेत या योजनांची माहिती आणि त्‍यासाठी लागणारी कागदपत्रे याबाबतची माहिती सर्व ग्रामस्थांना द्यावी. जेणेकरून पात्र लाभार्थींना या योजनेचा फायदा मिळू
शकेल अशी मागणी समितीचे अध्यक्ष शरद कर्ले यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली.
संजयगांधी निराधार, श्रावणबाळ आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी २१ हजाराच्या खाली वार्षिक उत्पन्न असावे अशी अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे अनेक लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्‍यामुळे उत्पन्नाची ही मर्यादा वाढविण्यात यावी, तसेच लाभार्थ्यांचा मुलगा २५ वर्षाचा झाला की या योजनेचा लाभ बंद होतो. मात्र नोकरी, व्यवसाय नसल्‍याने अनेक मुले बेरोजगार राहतात. त्‍यामुळे . २५ वर्षे मुलाची अट काढून टाकण्यात यावी. याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात यावे असा ठराव आजच्या सभेत करण्यात आला. तसेच सर्व सदस्यांनी मिळून पालकमंत्र्यांना निवेदन देण्याचेही निश्‍चित करण्यात आले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!