कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तात्पुरते केंद्र उभारणार

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती
त्या कर्मचाऱ्यांना 11 हजार रुपये मानधन सुरू
कणकवली शहरातील प्रलंबित विकास कामांबाबत ठेकेदारांना तातडीने सूचना
कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्याअनुषंगाने लवकरच एका एजन्सीची नियुक्ती होईल. या एजन्सीकडून शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. तसेच कणकवली शहरातील प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या असून काम विलंबाने झाल्यास अशा ठेकेदारांवर कारवाई देखील केली जाणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली. कुत्र्यांच्या नसबंदीच्या अनुषंगाने नियोजनाची बैठक त्यांनी नुकतीच घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक सुशांत नाईक, जयेश धुमाळे, रूपेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
श्री.पारकर म्हणाले, कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. सायंकाळ, रात्रीच्या वेळेस हे कुत्रे वाहनांचा पाठलाग करतात. अनेक वेळा दुचाकीस्वारांच्या टायरमध्ये गेल्याने अपघात होवून दुचाकीस्वार जखमी होतात. तसेच अनेक नागरिकांनाही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या तक्रारी नगरपंचायतीकडे आल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्व भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. श्री.पारकर म्हणाले, भटके कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी शहरात तात्पुरते केंद्र तयार केले जाणार आहे. त्यानंतर जाळ्याचा वापर करून एजन्सीमार्फत शहरातील भटकी कुत्री पकडली जाणार आहेत. कुत्र्यांना ताब्यात घेतल्यानंतर एजन्सीकडून प्रत्येक कुत्र्याला एक नंबर दिला जाणार असून तो नंबर कुत्र्याच्या कानावर लिहीला जाणार आहे. या कुत्र्यांना शहरातील एका केंद्रावर आणून त्यांचे लसीकरण, उपचार तसेच नसबंदी प्रक्रिया केली जाणार आहे. नसबंदीनंतर ज्या भागातून कुत्र्यांना उचलण्यात आले, त्याच भागात नंतर सोडून दिले जाणार आहे.
कुत्रे पकड आणि नसबंदीसाठी लवकरच निविदा प्रक्रिया होऊन एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. या एजन्सीकडून शहराच्या सर्व प्रभागातील भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याबाबतचे नियोजन होईल. दरम्यान शहरातील प्रत्येक घरामध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाडी जाते. यावेळी तेथे आलेल्या कर्मचाऱ्यांकडेच घरातील कचरा द्यावा. उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नका. यामुळे देखील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतोय असे श्री.पारकर म्हणाले. कणकवली शहरातील कचरा सफाई तसेच नळपाणी पुरवठा योजनेवर मानधन तत्वावर एजन्सीमार्फत कर्मचारी नेमले जातात. या कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार १४ हजार रूपये मानधनाची तरतूद आहे. यामध्ये सुरक्षा अनामत, पीएफ आणि इतर कपाती वगळून किमान ११ हजार रूपये मानधन मिळायला हवे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांना केवळ ६ ते ७ हजार रूपये एवढेच मानधन दिले जात होते. या कर्मचाऱ्यांना ११ हजार रूपये मानधन देण्यास भाग पाडले आहे. त्यानुसार डिसेंबर महिन्याचे मानधन ११ हजार रूपये प्रमाणे देण्यात आल्याची असल्याची माहिती श्री.पारकर यांनी दिली.
दिगंबर वालावलकर कणकवली





