संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

महाविद्यालयीन जीवनातील काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण म्हणजे महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन, या अविस्मरणीय क्षणांचे साक्षिदार ठरत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे केले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आयर्नमॅन किताब संपादन केलेले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, उद्योजक, प्रमोद भोगटे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्ज्वलन, नटराजांना पुष्पहार अर्पणकरुन व श्रीफळ वाढवून झाले. क. म. शि. प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री.अरविंद शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले. क. म. शि. प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री. अरविंद शिरसाट यांच्या हस्ते श्री. प्रमोद भोगटे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारल्यानंतर श्री. प्रमोद भोगटे यांनी आपणास हा बहुमान दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले व स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या.
मौजमजा मर्यादा राखून करा, हे तुमचे, आमचे विद्यार्थी व्यावसायिक क्षेत्रातील कलाकार नाहीत हे ध्यानात ठेवून त्यांना प्रोत्साहन देत कार्याक्रमांचा आस्वाद, आनंद घ्या असे सांगून उपकार्याध्यक्ष श्री. अरविंद शिरसाट यांनी शुभेच्छा दिल्या.
विविध गुणदर्शन कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराज यांना एका विशेष एकपात्री प्रयोगातून अभिवादन करण्यात आले तसेच दिवंगत नाट्यलेखक गंगाराम गवाणकर यांना एकपात्री प्रयोगातून आदरांजली अर्पण करण्यात आली. माजी सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर यांनी शोधीशी मानवा… हे गीत सादर केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी गौरव गीत, मराठी – हिन्दी गीतांवर विविध नृत्ये, रिमिक्स डान्स, शास्त्रीय मृदंग वादन, बासरी वादन आदी कार्यक्रम सादर केले.
याआधी आठवडाभर वार्षिक क्रीडास्पर्धा संपन्न झाल्या. तसेच विवध डेज् साजरे झाले. पारंपरिक वेशभूषा दिन व फनफेअर, फनी गेम्सचा विद्यार्थांनी आनंद घेताला. प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना शिस्त राखून विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन केले. उपस्थित विद्यार्थ्यांनीही सर्व कलाकार विद्यार्थ्यांना दाद देत संमेलन यशस्वी केले.विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे निवेदन साईवेद मालवणकर, सूचिता मांजरेकर, गायत्री गावकर यांनी केले.
प्रा. डॉ. आर. वाय. ठाकूर यांनी उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार प्रदर्शन केले. क. म. शि. प्र. मंडळाचे सरकार्यवाह श्री. अनंत वैद्य, सहकार्यवाह श्री. महेंद्र गवस तसेच सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मंगेश जांबळे, सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य प्राध्यापक, महाविद्यालयाच्या विविध समितीचे समन्वयक व इतर सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी सर्वांच्या सहकार्याने मराठा हॉल येथे संपन्न झालेले वार्षिक स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.





