एमआयडीसी असोसिएशन करणार ८ ला उद्योग मंत्र्यांचा सत्कार

एमआयडीसी साठी मंत्री उदय सामंत यांनी दिले ४० कोटी

कुडाळ : कुडाळ एमआयडीसीच्या विकासात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे गेल्या तीन वर्षांत मोठे सहकार्य मिळाले आहे. रस्ते, पाणी व वीज अशा मुलभूत सुविधांसाठी त्यांनी ४० कोटी रूपये उपलब्ध करून दिले आहेत. मात्र याचा कोणताही गाजावाजा त्यांनी केलेला नाही. असोसिएशनच्या वतीने करण्यात येणा-या सर्व मागण्या ते तातडीने पूर्ण करून हात सोडून निधी उपलब्ध करून देतात. त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने शनिवार दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याची माहीती, असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर व सेक्रेटरी नकुल पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ एमआयडीसी येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष श्री. होडावडेकर व सेक्रेटरी श्री. पार्सेकर बोलत होते. यावेळी माजी अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, शशिकांत चव्हाण, कुणाल वरसकर आदी उपस्थित होते.
     श्री. होडावडेकर म्हणाले, आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या सत्कार सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून आमदार दिपक केसरकर, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योजक हणमंतराव गायकवाड, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व अ‍ॅग्रिकल्चरचे चेअरमन आशिष पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात सकाळी ९ वाजता उद्योजक श्री. गायकवाड यांचे उद्योजकांना प्रेरणादायी मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. दुस-या सत्रात १० वाजता उद्योग मंत्री सामंत व मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन सोहळा, बुजुर्ग यशस्वी उद्योजक व विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या उद्योजकांचा सन्मान, गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. त्यानंतर मंत्री श्री. सामंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील उद्योजक, नव उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, श्री. होडावडेकर यांनी केले आहे

error: Content is protected !!