अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचा आदर्श कथामाला पुरस्कार चिंदर बाजार शाळेला प्रदान

अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण शाखेचा आदर्श कथामाला २०२५चा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर बाजार, तालुका मालवण शाळेला प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरण सोहळा चिंदर बाजार शाळेच्या सभागृहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी श्री. सुरेंद्र सकपाळ (अध्यक्ष स्कूल कमिटी जनता विद्यामंदिर त्रिंबक तथा उपाध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण) हे होते. तर सुरेश ठाकूर (अध्यक्ष), सुगंधा केदार गुरव (कार्यवाह), श्रुती गोगटे, मनाली फाटक सल्लागार समिती कथामाला मालवण, स्मिता जोशी मुखाध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता चिंदरकर उपस्थित होत्या .
प्रारंभीचे प्रास्ताविक सुरेश ठाकूर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात ते म्हणाले, “चिंदरबाजार शाळेने गेली दोन वर्षे सातत्यपूर्वक कथामालेचे काम केले आहे . विद्यार्थी आणि पालकांवर कथेच्या माध्यमातून संस्कार घडविले आहेत. त्याचे फलित म्हणजे आजचा हा पुरस्कार आहे.”
यावेळी सुगंधा केदार गुरव यांनी महिला पालकांना पालकत्वाची आणि संस्कारांची जाणीव करून दिली. तर श्रुती गोगटे यांनी मुलांचे विविध उपक्रम, त्यांचे आयोजन आणि सदर शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील यशाबद्दल कौतुक केले.
अध्यक्ष आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापिका स्मिता जोशी यांना काथामालेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. याचवेळी श्रुती गोगटे व सुगंधा गुरव यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता चिंदरकर यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. इयत्ता ३री, ४थी चे विद्यार्थी आणि पालकांना साधनाचे बालकुमार अंक (सुमेधा सदानंद कांबळी स्मरणार्थ) मनाली फाटक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
कथामालेच्या गौरव सोहळ्यास उत्तर देताना मुख्या. स्मिता जोशी म्हणाल्या, “गेली दोन वर्षे मी आणि माझ्या सहकारी शिक्षिका स्वाती पाटील यांनी नियोजनपूर्वक कथामालेचे कार्य केले, माझे विद्यार्थी आणि पालकांनी या उपक्रमांना उत्तम सहकार्य केले त्याचे फलित म्हणून आज मी त्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारीत आहे.” शाळेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक प्रगतीला आम्ही सदैव बांधील राहू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शाळेचा विद्यार्थी विहंग बेहेरे याने आणि मालवण कथामालेच्या वतीने सुरेश ठाकूर यांनी बोधपर कथा सांगितल्या.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री. सुरेंद्र सकपाळ म्हणाले, “कथामालेचा हा पुरस्कार म्हणजे तुमचा सन्मान आहे, कथामालेने पांघरलेली ही प्रेमाची शाल आहे. आपण सातत्य पूर्वक कथामाला उपक्रम घेत आहात याचे फार कौतुक आहे. पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या या कार्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.” या कार्यक्रमास मोहिनी पाटील, सौदामिनी बेहेरे, सुनीता खोत, सुप्रिया बांदिवडेकर, मंदार बांदिवडेकर, दूर्वा चिंदरकर, वर्षा पाडावे, प्रसाद पडवळ, गीता जगताप, किर्ती घाडी, निहारिका घाडी, वैष्णवी पडवळ, कस्तुरी बांदिवडेकर आदी बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी मनाली फाटक यांनी कथामालेच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन स्वाती पाटील सहाय्यक शिक्षिका यांनी केले.





