‘एक हात मदतीचा•••••• कर्तव्य भावनेचा!’

गोपुरी आश्रमाच्या वतीने पुरग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सौर कंदीलांचे वाटप
गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला. नद्यांना मोठे पूर आले, शेत वाहून गेली. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाला या अस्मानी संकटाचा खूप मोठा फटका बसला. यात धाराशिव जिल्ह्याला सुद्धा पावसाचा आणि पुराचा मोठा फटका बसला होता.
या बांधवांसाठी आपण काहीतरी सहकार्य करायला हवे अशी सूचना शिक्षिका भगिनी सरिता पवार यांनी गोपुरी आश्रमाच्या विद्यमान सचिवांना केली. गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक मेस्त्री यांनी ही कल्पना उचलून धरली. गोपुरी आश्रमाच्या हितचिंतकांना सोशल मीडियाच्या द्वारे आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले.
गोपुरी प्रेमीनी या आव्हानाला प्रतिसाद दिला. ७५ हजार रुपयांचा निधी जमा झाला. या निधीतून धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा हिंगणगाव बुद्रुक,पूर्ण प्राथमिक देवगाव खुर्द,पूर्ण प्राथमिक शाळा आवार पिंपरी व पूर्ण प्राथमिक शाळा लाकीबुकी या चार प्राथमिक शाळातील १५० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सौर कंदीलाचे वाटप करण्यात आले.
या परिसरातील नागरिकांसमोर विजेचा प्रश्न होता. या करिता सौर कंदीलांचे वाटप केल्यास विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्याचा चांगला उपयोग होईल, ही संकल्पना समोर ठेवून सौर कंदील वाटपाचा निर्णय घेण्यात आला.
३ नोव्हेंबर, २०२५ रोजी या सौर कंदीलाचे वरील शाळेतील मुलांना वाटप करण्यात आले. यावेळी गोपुरी आश्रमाचे ज्येष्ठ सदस्य निवृत्त शिक्षणाधिकारी मोहनराव सावंत, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री आणि नवनियुक्त संचालक मनोज सावंत,गोपुरी मित्रपरिवाराचे परेश परुळेकर उपस्थित होते.
गोपुरी आश्रमाने पूरग्रस्त ‘समाजाला एक हात…मदतीचा!’ या विचाराने हा खारीचा वाटा उचलला.
या सौर कंदील वाटपाच्या वेळी आवार पिंपरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्योतिराव जाधव, शिक्षक राहुल अंधारे (हिंगणगाव बुद्रुक) शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, शिक्षक किरण विभूते (देवगाव) प्राचार्य बाळासाहेब शिंदे, आबासाहेब घावटे (आवार पिंपरी) शिक्षक नितीन मस्तूद, हेडमास्तर जिक्रे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
गोपुरी आश्रमाने एवढ्या दूरवर येऊन आमच्या विद्यार्थ्यांना सौर कंदीलाचे वाटप केले त्याबद्दल आंम्ही गोपुरी आश्रम परिवाराचे कायम ऋणी राहू असे भावोद्गार शिक्षक बांधवांनी काढले.
गोपुरी आश्रमाने गेली ७७ वर्षे अप्पासाहेब पटवर्धन यांच्या प्रेरणेने समाजकार्याचे व्रत सुरू ठेवले आहे.





