शिवउद्योग संघटना कोकणी महोत्सव 2025 चे शानदार उद्घाटन

कोकणातील खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन
स्टॉल्सना बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘शिवउद्योग संघटना कोकणी महोत्सव २०२५’ या भव्य उपक्रमाचे शानदार उद्घाटन गुरुवारी सिंधुदुर्ग राजा मैदानावर झाले. कोकणातील खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची १८ ऑक्टोबरला सांगता होणार आहे.
या महोत्सवामध्ये कोकणात उत्पादित झालेले सर्व प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी स्टॉलवर उपलब्ध आहेत. हा महोत्सव विशेषतः महिला बचत गट आणि विविध गृहउद्योग यांच्यामार्फत बनवलेल्या फराळाचे प्रदर्शन आणि विक्रीचे केंद्र ठरला आहे. या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळाले आहे.
शिवसेनेमार्फत (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच असा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे. या प्रदर्शनात २३ स्टॉल लावण्यात आले आहे. या यशानंतर यापुढेही असेच नवनवीन उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही यावेळी आयोजकांनी दिली.
स्थानिकांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे. या महोत्सवामुळे बचत गटांना आणि गृहउद्योगांना मोठा आधार मिळत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या महोत्सवाला अवश्य भेट द्यावी आणि स्थानिक उद्योजकांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन या महोत्सवाच्या समन्वयक रचना नेरुरकर यांनी केल आहे. या शिव उद्योग सेनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्र भर सुरु आहे. अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक सणासुदीला राबविले जाणार असल्याचं शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीप्ती पडते यांनी सांगितलं.
यावेळी महिला जिल्हा प्रमुख दीपलक्ष्मी पडते, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विकास गावकर आणि अरविंद करलकर, शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख तथा महोत्सव समन्वयक रचना नेरुरकर, शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे आणि दीपक नारकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, युवा तालुकाप्रमुख सागर वालावलकर आणि अनिकेत तेंडुलकर, युवती तालुकाप्रमुख दिपाली कानसे, तालुका सचिव रेवती राणे, शहर अध्यक्ष श्रुती वर्दम, तालुका संघटक रोहित भोगटे, विभाग प्रमुख सौरवी चव्हाण, उपतालुकाप्रमुख मधुरा राऊळ, शिव उद्योग संघटना युवती वेंगुर्ला तालुकाप्रमुख पूजा तेंडुलकर, शिवउद्योग उपतालुकाप्रमुख राजन तोंडवलेकर, शिव उद्योग संघटना युवती कुडाळ तालुकाप्रमुख सारिका कदम, शिवउद्योग उपतालुकाप्रमुख पूजा तोंडवलेकर, राजन भगत, प्रसन्ना गंगावणे, जयदीप तुळसकर, राकेश नेमळेकर, राकेश कांदे, चंदन कांबळी, चेतन पडते, सिद्धेश परब, रंजिता नेरुरकर आणि स्टॉल धारक उपस्थित होते.
अभूतपूर्व प्रतिसादामुळे महोत्सव यशस्वीरित्या सुरू असून, या निमित्ताने सिंधुदुर्गवासीयांना कोकणी पदार्थांची चव चाखण्याची आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. उद्या १८ ऑक्टोबरला या महोत्सवाची सांगता होणार आहे.





