ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गिरिष नाईक यांची निर्दोष मुक्तता

ॲड. गिरीश नाईक यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. पृथ्वीराज रावराणे,ॲड. गायत्री मालवणकर यांचा युक्तिवाद
कणकवली न्यायालयात कारागृहातील आरोपींचे खोटे व बनावट रहिवासी दाखले बनवून घेऊन ते वास्तव्याचे दाखले व इतर कागदपत्रे खरे आहेत असे भासवून कणकवली येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करून न्यायालयाची फसवणूक केल्याच्या आरोपातून कोल्हापूर येथील वकील ॲड. गिरिष केशव नाईक यांची मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली श्री. शुभम लटुरिया यांनी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
ॲड. गिरिष नाईक यांच्या वतीने ॲड. राजेंद्र रावराणे, ॲड. पृथ्वीराज रावराणे व ॲड. गायत्री मालवणकर यांनी काम पाहिले.
कणकवली पोलीस स्टेशन गु. र. नं. 52/2011 दरोड्याच्या केसमधील भा. दं. वि. कलम 399, 506, 211 अन्वये आरोपी अनुक्रमे ममता गुलाब रोख (रा. विजापूर, कर्नाटक), शोभा यल्लप्पा जाधव (रा. विटा, जि. सांगली), व गंगुबाई यल्लप्पा कुरी (रा. विटा, जि. सांगली) या महिला आरोपी अटक झाल्या होत्या. त्यांना जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.
सदर आरोपींनी जामीन मिळण्याकरीता जिल्हा न्यायालय सिंधुदुर्ग येथे अर्ज दाखल केला होता, जो सत्र न्यायालयाने मंजूर केला होता. जिल्हा न्यायालयाने आरोपींना जामिनावर सोडताना कायम रहिवाशाचे पुरावे जमा करून घेण्याचा आदेश केला होता.
सदर आरोपींतर्फे मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात जामीनाच्या कामी ॲड. गिरिष नाईक यांनी तलाठी विटा, ता. खानापूर, तसेच ग्रामअधिकारी विजापूर यांचे सही शिक्का असलेले रहिवासी दाखले तसेच विटा येथील नगरसेवक यांनी दिलेले रहिवासी दाखले असे कागदपत्र हजर केले. कणकवली न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार सदरचे रहिवासी दाखले खरे आहेत का, याची पडताळणी करण्याकरीता कणकवली पोलीस स्टेशनला पाठवले.
रहिवासी दाखले खोटे असल्याचे उघड झाले.
त्याप्रमाणे कणकवली पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे यांनी विटा व विजापूर येथे जाऊन संबंधित कार्यालयात पडताळणी केली असता सदरचे सर्व रहिवासी दाखले हे खोटे व बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस निरीक्षक कणकवली यांच्यामार्फत तसा अहवाल न्यायालयात सादर केला गेला.
त्यानंतर कणकवली न्यायालयातील तत्कालीन न्यायदंडाधिकारी के. एम. कायनगुडे यांनी पोलीस निरीक्षक कणकवली यांना सदर प्रकरणी योग्य तो तपास करून गुन्हा दाखल करून दोषी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग पांढरे यांनी 7/7/2011 रोजी कणकवली पोलीस स्टेशन येथे सदर प्रकाराबाबत फिर्याद दाखल केल्याने कणकवली पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. 80/2011 चा गुन्हा दाखल करून त्याचा तपास पोलीस निरीक्षक एस. एस. बाबर यांनी केला होता.
न्यायालयात दोषारोप पत्र व युक्तीवाद
तपासाअंती आरोपींचे वकील ॲड. गिरिष केशव नाईक यांना आरोपी करून त्यांच्या विरुद्ध भा. दं. वि. कलम 466, 468, 471 अन्वये दोषारोप पत्र न्यायालयात पाठवण्यात आले होते.
सदर केसची सुनावणी मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर पूर्ण झाली. सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले, त्यामध्ये न्यायालयीन कर्मचारी, पिटिशन रायटर, तसेच तपासिक अंमलदार, पोलीस निरीक्षक संजय बाबर यांचा समावेश होता.
सुनावणी अंती, सदर रहिवासी दाखले बनावट असल्याचे जरी निष्पन्न झाले तरी ते तयार केलेले दाखले न्यायालयात सादर करण्यामध्ये वकील ॲड. गिरिष नाईक यांचा कोणताही सहभाग नव्हता. तसेच, तपासा कामामध्ये आरोपीचा गुन्ह्यात सहभाग असल्याबाबते कोणताही सबळ पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही, इत्यादी मुद्द्यांवर आरोपीतर्फे ॲड. राजेंद्र रावराणे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ॲड. गिरिष नाईक (कोल्हापूर) यांची निर्दोष मुक्तता केली.
कणकवली प्रतिनिधी





