फळपीक विमा प्रश्नी म. वि. आ. तर्फे ९ ऑक्टोबरला ओरोस येथे धरणे आंदोलन

‘ढोल बजाओ कृषिमंत्री भागाओ’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना विमा रक्कम नाही

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे विमा कंपनींच्या मुजोरीला कंटाळून महाविकास आघाडीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळत नाहीत, अशा कृषीमंत्र्यांना हटवलेच पाहिजे! असा हल्लाबोल करत येत्या गुरुवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “ढोल बजाव कृषीमंत्री हटाव” आंदोलन छेडण्यात येणार आहे. त्या आंदोलनात सर्व शेतकरी-बागायतदार यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. या आंदोलनानंतरसुद्धा शासनाने दखल घेतली नाही तर तालुकास्तरावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली.
      कुडाळ एमआयडीसी येथे सोमवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत माजी आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनाची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) प्रांतिक सदस्य बाळ कनयाळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, राष्ट्रवादी तालुकाप्रमुख शिवाजी घोगळे, कृष्णा धुरी, बबन बोबाटे, संतोष शिरसाट, अतुल बंगे, नाझिर शेख, संदिप महाडेश्वर आदी उपस्थित होते.
         यावेळी वैभव नाईक म्हणाले,शेतकऱ्यांनी तीन-चार वर्षांपासून प्रीमियम भरूनही विमा कंपनी शेतकऱ्यांना जुमानत नाही. जून-जुलैमध्ये भरपाई मिळायला हवी होती, पण ऑक्टोबर आला तरी एक रुपया मिळालेला नाही. गतवर्षी आंदोलन केल्यावरच रक्कम जमा झाली होती. यंदा मात्र पालकमंत्र्यांनी स्वतः घेतलेल्या बैठकीचाही पाठपुरावा केला नाही. अधिकारी वर्गाने पालकमंत्र्यांनाच केराची टोपली दाखवली आहे,शेतकऱ्यांची नुकसानभरपाई सव्वाशे कोटींपेक्षा जास्त आहे. हा प्रश्न पक्षीय नाही, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्कांचा आहे. त्यामुळे सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.
       महाविकास आघाडीचे नेते सतिश सावंत म्हणाले की, सिंधुदुर्गातील ३३ हजार ४९६ आंबा उत्पादकांनी ११ कोटी ५० लाख रुपये आणि १० हजार काजू उत्पादकांनी चार कोटी रुपये अशा सुमारे १४ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. पण ३० जूनपूर्वी मिळायला हवी असलेली नुकसानभरपाई आजपर्यंत मिळालेली नाही. विमा कंपनीकडून नुकसानग्रस्तांचा डाटा जाहीर झालेला नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकींना कंपनीचे प्रतिनिधी कधीच येत नाहीत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे विभागावर नियंत्रण नाही. म्हणूनच गुरुवारी ‘ढोल बजाव, कृषी मंत्री हटाव’ या घोषणेसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे. दिवाळीपूर्वी पैसे मिळाले नाहीत, तर दिवाळीनंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा सावंत यांनी दिला.
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्षाद शेख म्हणाले, फळपिक विमा निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळेवर जमा केला जात नाही. परिणामी शेतकऱ्यांचा पैसा रखडतो. हे सरकार सर्वसामान्यांचं नसून धनदांडग्यांचं सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बाळ कनयाळकर यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

error: Content is protected !!