जिल्ह्यात प्रथमच हवामान बदल, वाढते पर्यटन आणि पाण्यात बुडण्याच्या घटनांचा अभ्यास

एसआरएम कॉलेजसह दोन संस्थांचा संयुक्त उपक्रम
येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई व रेसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेवलपमेंट, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच हवामान बदल, वाढते पर्यटन आणि पाण्यावर आधारित उपजीविका यामुळे या परिसरात वाढलेल्या बुडण्याच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासादरम्यान गावातील लोकांच्या धारणा व अनुभव, आपत्तीपूर्व,दरम्यान आणि नंतरचे स्थानिक प्रतिसाद, पारंपरिक ज्ञान आणि सामूहिक पद्धती, बुडण्याच्या घटनांची कारणे , पर्यावरणीय बदलांचा परिणाम व स्थानिक पातळीवरील उपाययोजना यावर भर देण्यात आला. या अभ्यासात संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
पहिल्या सत्रात मालवण तालुक्यातील दांडी, तारकर्ली, आचरा, तोंडवली, तळाशील आणि वायरी-भूतनाथ या सहा गावांना सहभागी करण्यात आले होते. तसेच २५ व २६ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवसीय क्षमता-वृद्धी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पहिल्या दिवशी संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या डॉ.अनुराधा गावडे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भू आकृतीशास्त्रावर (Geomorphology) सविस्तर व माहितीपूर्ण सत्र घेतले. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या प्रा. राजश्री यांनी अभ्यासाची उद्दिष्टे व पार्श्वभूमी याबाबत मार्गदर्शन केले. पुढच्या सत्रात सह-प्रमुख संशोधक प्रा. महेश कांबळे यांनी आपत्ती विषयक संकल्पनांची स्पष्टता व सर्वेक्षणाचे महत्त्व यावर आधारित सत्र घेतले.,टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे.
दुसऱ्या दिवशी डॉ. अर्चना दिवटे यांनी सखोल मुलाखती (In-depth interviews) आणि फोकस ग्रुप डिस्कशन कसे घ्यावेत यावर पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेतली. दोन्ही संस्थांतील विद्यार्थ्यांनी २७ आणि २८ एप्रिल रोजी क्षेत्रभेटी घेतल्या. या दरम्यान त्यांचा मुक्काम गावात होता. प्रभावी माहिती संकलनासाठी गावांमध्ये राहणे अत्यंत महत्त्वाचे होते. भविष्यात बुडण्याचे प्रमाण कमी व्हायला हा अभ्यास सहाय्यभूत ठरेल अशी आशा आहे.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.स्मिता सुरवसे, डॉ. अनुराधा गावडे ,डॉ. रवींद्र गावडे, प्रा.महेंद्र कांबळे, डॉ.अर्चना दिवटे, ब्रिनिलिया डिसोझा आदींनी हा उपक्रम घेण्यासाठी सहकार्य केले.





