संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये ‘आतिथ्य’ वर कार्यशाळा

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) तर्फे नुकतेच “आतिथ्य कौशल्ये : स्वागतशील परिसर संस्कृतीची निर्मिती” या विषयावर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
‘अतिथी देवो भव’ या आपल्या संस्कृतीला अनुसरून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि अतिथी यांचे स्वागत, आदरातिथ्य कसे करावे याचे मार्गदर्शन करणे आणि महाविद्यालय परिसरात स्वागतशील संस्कृती वृद्धिंगत करणे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय कोकरे उपस्थित होते. ते पाटकर वर्दे महाविद्यालय, कुडाळ येथील हॉस्पिटॅलिटी अँड केटरिंग विभागाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी लंडन येथे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून इंग्लंड आणि दुबई येथील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यानुभव प्राप्त केला आहे.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संजय कोकरे यांनी कोणतीही संस्था यशस्वीपणे चालविण्यासाठी आतिथ्यभाव किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित केले. शैक्षणिक संस्थेचे शिक्षकेतर कर्मचारी हे त्या संस्थेचे पहिले प्रतिनिधी असतात. महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, पालक किंवा पाहुणे सर्वप्रथम अशाच कर्मचाऱ्यांच्या संपर्कात येतात. त्यामुळे संस्थेबद्दलची पहिली छाप ही त्यांच्या वर्तन, संवादकौशल्य आणि स्वागतशीलतेवर अवलंबून असते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेदरम्यान त्यांनी पाहुण्यांचे स्वागत कसे करावे, चहा-कॉफी कशी सर्व्ह करावी, अधिकाऱ्यांसमोर उभे राहण्याची योग्य पद्धत कोणती, तसेच विनम्र व व्यावसायिक संवाद कसा साधावा याविषयी प्रत्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. रवींद्र ठाकूर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सूरवसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संजय कोकरे यांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकेतर कर्मचारी या कार्यशाळेस उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे महाविद्यालयातील परिसरात अधिक स्वागतशील आणि सुसंस्कृत वातावरण निर्मितीस निश्चितच हातभार लागेल असा विश्वास यावेळी प्राचार्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाचे अधीक्षक संगम कदम यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा खेमराज कुबल यांनी विशेष मेहनत घेतली.

error: Content is protected !!